

मुंबई : मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे राम मंदिर रोड ते रिलीफ रोड गोरेगाव पश्चिमपर्यंत एस. व्ही. रोड लगत विस्तारीकरण करण्याचे काम सुरू आहे. 161 कोटी 63 लाख रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पाची किंमत दोन वेळा वाढवण्यात आली. त्यामुळे प्रकल्प खर्चामध्ये तब्बल 36 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
गोरेगाव येथे मृणालताई गोरे उड्डाणपूल उभारण्यात आला असून या पुलाचे आता राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोडलगत विस्तारीकरणाचे काम करण्यात येणार आहे. मार्च 2019 पासून या कामाची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचा मूळ प्रस्ताव 161 कोटी 63 लाख 31 हजार रुपये इतका होता. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामांमध्ये वाढ झाल्यामुळे हा खर्च 29 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला. त्यानंतर पुन्हा कामाची व्याप्ती वाढवल्यामुळे हा खर्च 7 कोटी रुपयांनी वाढल्यामुळे एकूण प्रकल्पाचा खर्च 197 कोटी रुपयांवर पोहोचला. या प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या उड्डाणपुलाशेजारी राहणाऱ्या लोकांना गाड्यांच्या आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे महापालिकेने दोन्ही बाजूस ध्वनिरोधक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय दिशादर्शक फलक व अन्य कामे करण्यात येणार असल्यामुळे खर्चामध्ये वाढ झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपूल 2016 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता या पुलाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास जलद होणार असून एस.व्ही. रोडवर होणारी वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.