Flamingos in Mumbai: फ्लेमिंगोंना आकर्षित करणाऱ्या पाणथळ जागा धोक्यात

प्रदूषण, शेवाळ, अतिक्रमणांमुळे फ्लेमिंगो सिटीची ओळख पुसणार; अधिवासांच्या स्वच्छतेची पर्यावरणप्रेमींची मागणी
Flamingos in Mumbai
Flamingos in MumbaiPudhari
Published on: 
Updated on: 

उरण: यंदाच्या हिवाळ्यात नवी मुंबई आणि मुंबई परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे लवकर आणि मोठ्या संख्येने आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यांना आकर्षित करणाऱ्या पाणथळ जागांची स्थिती खालावली असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

कच्छमध्ये यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाण्याची पातळी आणि खाद्य उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे योग्य खाद्य अधिवासांच्या शोधात फ्लेमिंगो नेहमीपेक्षा लवकर स्थलांतर करू शकतात, असे सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशनचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांनी सांगितले.

Flamingos in Mumbai
Mumbai Roads: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ८२ टक्के रस्ते खड्डेमुक्त; उर्वरित रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार?

मात्र, प्रदूषित पाणी, शेवाळाची अतिवाढ आणि भरती-ओहोटीच्या नैसर्गिक प्रवाहातील अडथळे यांमुळे डीपीएस फ्लेमिंगो लेक, एनआरआय वेटलँड आणि टी. एस. चाणक्य वेटलँड या प्रमुख अधिवासांची स्थिती फ्लेमिंगोंच्या स्वागतासाठी पुरेशी चांगली नसल्याचे नॅट कनेक्ट फाऊंडेशने म्हटले आहे.

संस्थेचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, या वर्षीच्या सुरुवातीला खासगी प्रयोगशाळेत केलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीत प्रदूषणाचे वाढलेले निर्देशक आढळले. नेरूळमधील एनआरआय वेटलँडमध्ये शेवाळाची प्रचंड वाढ झाली असून, टी. एस. चाणक्य तलावात अतिक्रमण आणि जलप्रवाहात हस्तक्षेप होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Flamingos in Mumbai
Navi Mumbai Redevelopment: नवी मुंबईतील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा! क्लस्टर पुनर्विकासावरील स्थगितीचा ठराव रद्द

स्वर्णश्रुष्टी हॅबिटॅट रिस्टोरेशन फाउंडेशनच्या संचालिका ज्योती नाडकर्णी यांनी न्यायालयाचे आदेश आणि समित्यांची नियुक्ती होऊनही कांदळवन-पाणथळ परिसंस्थेच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. या अधिवासांच्या ऱ्हासामुळे पक्षीनिरीक्षण, निसर्गशिक्षण आणि स्थानिक पर्यटनाच्या मोठ्या संधी वाया जात असून, स्थानिक मार्गदर्शक, वाहतूक व आतिथ्य क्षेत्राला मिळणारा फायदा धोक्यात आला आहे, असेही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन यांच्या मते, पाणथळ जागांचे आरोग्य केवळ फ्लेमिंगोंसाठीच नव्हे, तर मासेमारी समुदायांना आधार देण्यासाठी आणि पुराच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नैसर्गिक स्पंजप्रमाणे काम करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. फ्लेमिंगोंच्या आगमनापूर्वी या जागांची तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी त्यांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news