

उरण ः मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने हार्बर लाईनवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, 1 मे 2026 पासून सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील 14 नॉन-एसी उपनगरीय सेवांचे रूपांतर एसी सेवांमध्ये करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या आता 108 वर पोहोचली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन 14 फेऱ्यांनंतर हार्बर मार्गावर एकूण 28 एसी सेवा उपलब्ध होतील, तर मुख्य मार्गावर 80 एसी सेवा सुरू राहतील. हार्बर लाईनवर 26 जानेवारी 2026 रोजी पहिली एसी लोकल धावली होती, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात या सेवा वाढवण्यात आल्या आहेत.
असे असेल एसी लोकलचे वेळापत्रक (सोमवार ते शनिवार):अप दिशा (सीएसएमटीकडे): वाशी (सकाळी 6:23), पनवेल (सकाळी 8:45 - गर्दीची वेळ), पनवेल (सकाळी 11:43), बेलापूर (दुपारी 2:28), पनवेल (संध्याकाळी 5:07), पनवेल (रात्री 8:07) आणि पनवेल (रात्री 10:58).
डाउन दिशा (पनवेल/वाशीकडे): सीएसएमटी (सकाळी 7:17), सीएसएमटी (सकाळी 10:10), सीएसएमटी (दुपारी 1:07), सीएसएमटी (दुपारी 3:36), सीएसएमटी (संध्याकाळी 6:33 - गर्दीची वेळ), सीएसएमटी (रात्री 9:30) आणि सीएसएमटी (मध्यरात्री 12:24).
या सर्व वातानुकूलित सेवा सोमवार ते शनिवार या कालावधीतच चालवल्या जातील. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या फेऱ्या सामान्य (नॉन-एसी) लोकल म्हणून चालवल्या जातील, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
काही नॉन-एसी गाड्यांच्या वेळेत बदल:
1. बेलापूरसीएसएमटी लोकल (12) आता 6:08 ऐवजी सकाळी 6:02 वाजता सुटेल.
2. वाशीसीएसएमटी लोकल (16) आता 6:16 ऐवजी सकाळी 6:23 वाजता सुटेल.
3. सीएसएमटीवाशी लोकल (69) आता 23:42 ऐवजी मध्यरात्री 00:24 वाजता सुटेल.
4. सीएसएमटीपनवेल लोकल (3) आता 00:24 ऐवजी रात्री 23:42 वाजता सुटेल.
प्रवाशांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी केले आहे.