

माणगाव : कमलाकर होवाळ
कोकणवासीयांसाठी जीवनरेखा मानला जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अजूनही पूर्णपणे तयार झालेला नसताना आता या मार्गावर तीन टोल नाके सुरू करण्याची तयारी सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ता, सुरू असलेली बांधकामे, अपुऱ्या सुविधा आणि वाहतुकीच्या अडचणी यामुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहनचालकांना आता तिहेरी टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या सुमारे 90 किलोमीटर अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एका प्रवासात दोन वेळा टोल भरावा लागणार आहे. याशिवाय पुढील टप्प्यात लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाक्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सिग्नल यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे “रस्ता अपूर्ण असतानाही टोल कशासाठी ?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक, नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबईगोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांसाठी अत्यंत नुसता महत्त्वाचा मार्ग नाही तर कोकण वासीयांची जीवनवाहिनी आहे. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे रस्ता पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारावा, अशी जोरदार मागणी पर्यटक प्रवासी नागरिकाकडून होत आहे.
अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी तीव्र भावना सध्या नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगाव बायपासचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे दोन्ही शहरांच्या बाजारपेठांमध्ये दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना तासन्तास अडकून राहावे लागत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कोकणच्या विकासाचा कणा मानला जाणारा हा महामार्ग अद्याप अपूर्ण असतानाच पळस्पे ते पोलादपूर दरम्यान तीन टोल नाके सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर अद्याप पुरेशा सुविधा, सेवा रस्ते, वाहतूक व्यवस्थापन किंवा प्रवाशांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे “रस्ता अपूर्ण, सुविधा शून्य आणि टोल मात्र तिहेरी” अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रवासी, वाहनचालक आणि कोकण वासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रथम महामार्गाचे काम पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा आणि त्यानंतरच टोल आकारणीचा विचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरत आहे.
टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत अधिकृत माहिती नॅशनल हायवे प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळेल अशी चर्चा सुरू आहे. या मार्गावर टोल सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पळसपे ते इंदापूर या दरम्यान अनेक गावांना जोडणारे उपमार्ग आहेत. मात्र या गावांकडे जाणारे बहुतांश रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. काही ठिकाणी तर केवळ ब्लॉक टाकून तात्पुरते मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गावर अजूनही अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रसाधन गृह, विश्रांती गृह पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट, चार्जिंग सुविधा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना टोल वसुली करणे योग्य नाही, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
मुंबईगोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचे काम 2011 साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्यांमधील अडथळे, भूसंपादनातील विलंब आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वारंवार अडचणीत सापडत गेले. परिणामी तब्बल 16 वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही महामार्गाचे अनेक भाग अद्याप अपूर्ण आहेत. नागोठणे आणि कोलाड परिसरातील काही पुलांची कामे अजूनही सुरू आहेत. काही ठिकाणी अपूर्ण रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच माणगाव आणि इंदापूर आणि येथील बायपास रस्त्यांची कामेही पूर्ण झालेली नाहीत. तरीही टोल वसुलीची तयारी सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.