

MNS 20th Foundation Day
रायगड :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन सोमवार (दि. ९ मार्च) रोजी साजरा होत असून, पक्षप्रमुख राज ठाकरे रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या ‘एक्स’ हॅंडलद्वारे राज्यातील सर्व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ९ मार्च २०२६ रोजी पक्षाचा २० वा वर्धापन दिन आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या या पक्षाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या निमित्ताने १० मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्याआधी ९ मार्च रोजी सकाळी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून स्वतःपासून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार आहे. त्यामुळे अशा पवित्र ठिकाणी जाऊन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून सांगितले की, सदस्य नोंदणी ही केवळ महाराष्ट्र सैनिकांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राला आकार देण्याची इच्छा असलेल्या आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल असंतोष असलेल्या सर्वांना या अभियानाशी जोडून घ्यावे. नव्याने पक्षाशी जोडले जाणारे सर्व जण महाराष्ट्राचे पाईक आहेत, याची जाणीव स्वतः ठेवावी आणि लोकांनाही करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पक्षाची सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही करण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. याबाबतचा सविस्तर तपशील १० मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे. पक्षाच्या शाखांबाहेर स्टॉल लावण्याबरोबरच बाजारपेठा, शाळा, मंदिरे, महाविद्यालये, मैदान, बागा यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणीही सदस्य नोंदणी केंद्र उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन करत, या कामासाठी आवश्यक ती मदत पदाधिकारी व पक्षाचे नेते देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.