

इंदापूर : विनोद सापळे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर ते कशेणे दरम्यान अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या पाच दिवसांत घडलेल्या विविध अपघातांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केमिकल टँकरची कारला जोरदार धडक इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात यापूर्वी अपघाताची घटना घडली. दुसऱ्या घटनेत भर बाजारपेठेत एसटी बसची कारला धडक होऊन गंभीर पादचारी गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला.
महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा आणि दोन कारचा अपघात झाला. मुंबईकडून महाडच्या दिशेने जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरने महाडकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या कारलाही अपघाताचा फटका बसला. या अपघातात दोन्ही कारमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. केमिकलने भरलेल्या टँकरचा अपघात झाल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
बाजारपेठेत बसची कारला धडक या अपघातापासून स्वतंत्र अशी दुसरी घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास इंदापूरच्या भर बाजारपेठेत घडली. आडव्याच्या समोर उभ्या असलेल्या का ला महाडच्या दिशेने जाणाऱ्या नालासोपारा-ठाणे-आंबेगाव एसटी बसने जोरदार धडक दिली.
या धडकेत कारचे नुकसान झाले. याचवेळी रस्त्याच्या साईडपट्टीवरून चालत असलेले राजेंद्र डोंगरदास मेहता, वय ६५ यांनाही एसटी बसची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतंत्रपणे घडल्या असल्या, तरी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे इंदापूर परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे, खड्डे, अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, अपुऱ्या सूचना फलकांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील नागोठणे, कोलाड, माणगाव, इंदापूर आणि महाड परिसरात वाहतुकीचा ताण जाणवतो.
अरुंद रस्ते, संरक्षक कठड्यांचा अभावामुळे अधिक धोका
इंदापूर ते कशेणे दरम्यान महामार्गावरील अपूर्ण कामे, काही ठिकाणी असलेली अरुंद रस्त्यांची परिस्थिती, मोऱ्यांना संरक्षक कठडे नसणे, रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांच्या फांद्या आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः इंदापूर स्टेट बँकेसमोरील कठडे नसलेली मोरी अपघाताचा धोका निर्माण करणारी ठरली आहे. याच मोरीत यापूर्वी एक महिला पडून गंभीर जखमी झाली होती. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. याबाबत दैनिक पुढारीमधून वारंवार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी मोरीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.