

बोईसर : सालवड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर परिसरात रासायनिक अवशेष असलेल्या प्लास्टिकच्या जुन्या टाक्या आणि ड्रमचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या टाक्यांचे कटिंग आणि धुलाई केली जात असून, त्यातून बाहेर पडणारे रसायनमिश्रित पाणी थेट उघड्या गटारात सोडले जात असल्याची बाब समोर आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिवाजीनगर परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर तसेच गोदामांमध्ये औद्योगिक कारखान्यांमध्ये रसायने साठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या जुन्या प्लास्टिकच्या टाक्या आणि ड्रम आणून ठेवण्यात आले आहेत. या टाक्यांवर रासायनिक पदार्थांचे डाग दिसून येत असून, त्यांची कोणतीही योग्य सुरक्षितता न बाळगता कटिंग आणि धुलाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे, टाक्यांच्या धुलाईनंतर निघणारे रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट गटारात सोडले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरातील माती, भूजल आणि जलस्रोतांच्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औद्योगिक वापरानंतर रासायनिक अवशेष शिल्लक असलेल्या टाक्यांची साठवणूक, वाहतूक, स्वच्छता आणि विल्हेवाट यासाठी पर्यावरणविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, सालवडमधील या ठिकाणी संबंधित नियमांचे पालन केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सालवड ग्रामपंचायत प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित भूखंड आणि गोदामांची पाहणी करावी. तसेच सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन साठवणूक व प्रक्रियेच्या परवानग्यांची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.