

रायगड: भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आपल्या प्रियकराला घरात कोंडून 23 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करुन, आपल्या साथीदारा बरोबर उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेली राणी विनायक चव्हाण (रा. धानसर, तळोजा) आणि तिचा साथीदार शुभम पप्पु उर्फ पवनकुमार जयसवाल (वय 26) या दोघांना पोयनाड पोलिसांनी केवळ 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 23 लाख 5 हजार रुपयांचा 100 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात यश मिळवले आहे. फिर्यादी हे पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन देहेन येथे भाड्याने राहतात.
13 एप्रिल रोजी फिर्यादी झोपलेले असताना, फिर्यादीची प्रेयसी आरोपी राणी विनायक चव्हाण हिने फिर्यादीला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरातील 18 लाख 20 हजार रुपये किमतीचे 18.2 तोळे सोन्याचे दागिने, 4 लाख रुपयांची रोकड आणि 85 हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन असा एकूण 23 लाख 05 हजार रुपयांचा ऐवज लंपास करुन, चोरी केल्यानंतर राणी विनायक चव्हाण हीने फिर्यादीला घरात कोंडून ती पसार झाली होती.
पोलीस पथकाने तातडीने हालचाली करत तुर्भे येथून राणी चव्हाण (वय 29) आणि तिचा साथीदार शुभम पप्पु उर्फ पवनकुमार जयसवाल (वय 26) यांना ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यात शुभमचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.