

पेणः पावसाळा तोंडावर आलायं,पावसाळ्यात साथीच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आदेश जि.प.सभापती वैकुंठ पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
पेण येथे आयोजित आढावा बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुळकर, रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका साळुंखे, पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी, जेएसडब्ल्यू सीएसआर विभाग अधिकारी सुधीर तेलंग, रसिक काळे तसेच जि. प. सदस्य सभापती जागृती मानकर, जि. प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, जि. प. सदस्य जनार्दन भस्मा, पं. स. सदस्य विवेक म्हात्रे तसेच आरोग्य विभाग अधिकारी आणि सर्व संवर्गाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजांचा आढावा घेतला. पेण विधानसभा मतदार संघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सुस्थितीत ठेवा, सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर फिल्ड व्हिजिट करा. आगामी पावसाळा पूर्व कामे व औषधपुरवठा तत्पर ठेवा,अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीत फील्ड व्हिजिटवर विशेष भर देण्यात यावा, सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना नियमित भेट द्यावी. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी सातत्याने गृहभेटी द्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
आरोग्य केंद्राच्या बांधकामामध्ये असणाऱ्या त्रुटींची पूर्तता पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश रायगड जिल्हा कृषी व पशु संवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच रिक्त पदे तात्काळ भरणे, औषधसाठा नियमित ठेवणे, आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करणे व शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आदिवासी विभागात मुलभूत गरजा पुरवा
जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागाच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी त्यापूर्ण करण्यावर भर द्यावा असे आदेश यावेळी देण्यात आले.
कळवा, गडब केंद्रांसाठी अडीच कोटींचा निधी
कळवा आणि गडब येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी प्रत्येकी सुमारे अडीच कोटीचा निधी नॅशनल हेल्थ मिशन आणि जिल्हा नियोजन समिती कडून मंजूर झाला असून लवकरच या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली.