

नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेला टीसीएल निर्जंतुकीकरण पदार्थ उपलब्ध नसल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) उपशहर प्रमुख तथा राजेंद्रगुरुनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष संदीप नारायण उतेकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
उतेकर यांनी प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या नेरळ ग्रामपंचायत प्रशासकांच्या अधिपत्याखाली कार्यरत असून ग्रामपंचायतीकडून नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी अत्यंत गढूळ स्वरूपाचे आहे. परिणामी अनेक नागरिकांना वर्षभर पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पावसाळ्यापूर्वी पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेला टीसीएल निर्जंतुकीकरण पदार्थ उपलब्ध नसल्याचे दिसून आले असून, पाण्याची गढूळताही वाढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नेरळमधील नागरिक स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याची खंत उतेकर यांनी व्यक्त केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देऊन आवश्यक ती पाणी शुद्धीकरण व्यवस्था करावी. लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्या तरी तोपर्यंत नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे ही प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामसभेमध्ये शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला असून, पाणीपट्टी वाढीवेळी नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
नेरळमधील एक जागरूक नागरिक या नात्याने ग्रामपंचायतीकडून दुर्लक्षित होत असलेल्या बाबी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे हे माझे कर्तव्य आहे, असेही उतेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती पंचायत समिती कर्जतचे सभापती तसेच गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.
नेरळ ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर सध्या प्रशासकीय यंत्रणेवर टीका होत असली, तरी हा प्रश्न केवळ आताचा नसून अनेक वर्षांपासून नागरिकांकडून गढूळ पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी होत आल्या आहेत. त्यामुळे आज प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, यापूर्वी सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष का केले, असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेवरून निर्माण झालेला हा वाद आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकच चर्चेचा विषय ठरत असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासनासह विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधी यांची चुपी व ते या संदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे नेरळकरांचे लक्ष लागले आहे.