

चिखलोली : अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणातील प्रदूषण प्रकरण उघड होऊन जवळपास वर्ष उलटत आले असले, तरी आजही पाण्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता कायम असल्याचे चित्र आहे.
2025 मध्ये औद्योगिक सांडपाणी धरणाच्या जलसंकलन क्षेत्रात मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव अधिकृत पत्रव्यवहारातून समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाकडून कारवाईचे दावे करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत किती सुधारणा झाली, हा प्रश्न आजही अनुत्तरित असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
चिखलोली (जांभिवली) धरण हे अंबरनाथ शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्रोत मानले जाते. लाखो नागरिकांचा दैनंदिन पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असताना त्यात औद्योगिक रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याची बाब समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
ठाणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2025 मध्ये संबंधित औद्योगिक युनिटला पाठवलेल्या पत्रांमध्ये “प्रदूषित आणि अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी” धरणाच्या कॅचमेंट भागात जात असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीतही पाण्यात प्रदूषणाची चिन्हे आढळल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
यानंतर संबंधित उद्योगांना नोटिसा देण्यात आल्या, काही कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, तर प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही अंबरनाथ परिसरातील दूषित नाले, रासायनिक वास आणि प्रदूषणाबाबतच्या तक्रारी थांबलेल्या नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाकडून कारवाईची घोषणा केली जाते; मात्र प्रदूषण पूर्णपणे थांबले का, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. काही भागांमध्ये अजूनही दूषित पाणी वाहत असल्याच्या तक्रारी अधूनमधून पुढे येत आहेत. अंबरनाथ परिसरातील पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अनेक आणि यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्यामुळे औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. “झिरो डिस्चार्ज”च्या नावाखाली काही उद्योग थेट नाले आणि जलस्रोतांकडे रासायनिक पाणी सोडत असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत.
दरम्यान नळामधून येणारे पाणी सुरक्षित आहे का,याची खात्री हवी. प्रशासनाने वेळोवेळी तपासणी अहवाल जाहीर करावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. चिखलोली धरण प्रदूषण प्रकरणामुळे आता स्थानिक राजकारणही तापण्याची शक्यता आहे.
वाढती लोकसंख्या,नव्या गृहप्रकल्पांची संख्या आणि औद्योगिक विस्तार यामुळे पाणीपुरवठ्यावर ताण वाढत असताना जलस्रोतांचे संरक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या मते, अंबरनाथ शहराच्या भविष्यासाठी चिखलोली धरण सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अन्यथा भविष्यात पाणीटंचाईबरोबरच गंभीर आरोग्य संकट निर्माण होऊ शकते. सामाजिक संस्था आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी आता फक्त नोटिसा आणि तात्पुरत्या कारवायांपेक्षा दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये धरण परिसरामध्ये नियमित पाणी गुणवत्ता तपासणी, दूषित नाल्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण, प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर दंडात्मक कारवाई, नागरिकांसाठी पाणी तपासणी अहवाल सार्वजनिक करणे, या मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, “चिखलोली धरणातील पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे का?” हा प्रश्न आजही अंबरनाथकरांच्या मनात कायम असून प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
उल्हास नदी खोरेही प्रदूषणाच्या विळख्यात
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरच्या औद्योगिक पट्ट्यातील प्रदूषणाचा परिणाम आता संपूर्ण उल्हास नदी खोऱ्यावर होत आहे. वालधुनी नदीसह अनेक नाल्यांमधून वाहणारे रासायनिक पाणी अखेरीस नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दावा केला की, पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होते.
औद्योगिक परिसरातील दूषित पाणी थेट नाल्यांमार्फत धरणाच्या परिसरात पोहोचण्याचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ कागदोपत्री कारवाई न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. चिखलोली धरणातून अंबरनाथ शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा होत असल्याने दूषित पाण्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.