Morjhot Waterfall : खोपड मोरझोत धबधबा पर्यटकांना खुणावतोय

निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण,हिरवीगार वनश्रीही बहरली
Morjhot Waterfall
Morjhot Waterfallpudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील खोपड–चांदके मार्गावरील निसर्गरम्य मोरझोत धबधबा पावसाच्या जोरदार सरींमुळे पुन्हा एकदा प्रवाहित झाला असून, परिसरातील निसर्गसौंदर्याला नवसंजीवनी मिळाली आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, दाट धुक्याची चादर आणि उंच कड्यावरून कोसळणारा शुभ्र जलप्रपात यामुळे हा परिसर पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. पावसाळ्याच्या हंगामात धबधबा सुरू झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणातील पावसाळा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच. या काळात डोंगरदऱ्यांतून वाहणारे असंख्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यापैकी पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावाजवळील खोपड मोरझोत धबधबा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. रस्त्यालगत असल्याने प्रवाशांना सहज थांबून या धबधब्याच्या मनमोहक सौंदर्याचा आनंद घेता येतो.

Morjhot Waterfall
Ganpatipule Drowning incident : गणपतीपुळे समुद्रात पाच पर्यटक बेपत्ता

उमरठ हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव असल्याने या परिसराला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला तसेच रामाचे कुडपण येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट दिल्यानंतर पर्यटक मोरझोत धबधब्याकडे आवर्जून वळतात. वरंध घाटातून तसेच रामदास पठार परिसरातूनही या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

शनिवार-रविवारच्या सुट्टीत मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. धबधब्याखाली स्नानाचा आनंद घेताना पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात रमून जातात. सन २०२१ मध्ये या परिसरात दरड कोसळल्याने काही काळ पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या उपाययोजनांमुळे परिसर पुन्हा सुरक्षित झाला असून, आज खोपड मोरझोत धबधबा पूर्वीइतकाच देखणा आणि आकर्षक दिसत आहे. शुभ्र पाण्याच्या धारा आणि त्यातून उधळणारे जलतुषार पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतात.

मोरझोत धबधब्याला भेट देताना पर्यटकांना नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, रायगड किल्ला, प्रतापगड, किनेश्वर तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले गायमुख या स्थळांनाही भेट देता येते. त्यामुळे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी येथे उपलब्ध होते.

Morjhot Waterfall
Goa monsoon tourism-वर्षा पर्यटनाला हिरवा कंदील; जीएफडीसीचे धबधबे खुले

दरम्यान, पावसाळ्यात धबधब्याला भेट देताना पर्यटकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, पाण्याच्या प्रवाहात अति साहस करू नये आणि परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचे संवर्धन करावे, असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news