Ganpatipule Drowning incident : गणपतीपुळे समुद्रात पाच पर्यटक बेपत्ता

बुडालेले सर्वजण छत्रपती संभाजीनगरचे; जोरदार समुद्री प्रवाहामुळे बचावकार्यात अडथळे
Ganpatipule Drowning incident
गणपतीपुळे समुद्रात पाच पर्यटक बेपत्ता
Published on
Updated on

गणपतीपुळे : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. समुद्रस्नानासाठी उतरलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटकांच्या गटातील पाच तरुण समुद्राच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत हे पाचही जण बेपत्ता असून पोलिस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.

आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९, सर्व बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील १९ जणांचा गट पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० च्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर फिरताना काही तरुण समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील जोरदार प्रवाह आणि वाढलेल्या लाटांचा अंदाज न आल्याने काहीजण खोल पाण्यात ओढले गेले. क्षणातच परिस्थिती गंभीर बनली आणि पाचजण समुद्रात बेपत्ता झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षक, ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र समुद्रातील वेगवान करंट आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तरीही जीवरक्षक आणि स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाडे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्याचा आढावा घेतला. शोधमोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पोलिसांचा बंदोबस्त किनाऱ्यावर तैनात केला आहे.

कस्टम विभाग, स्थानिक मच्छीमारांच्या बोटी, जीवरक्षक आणि पोलिस यांच्या संयुक्त सहभागातून समुद्रात विशेष शोधमोहीम राबवण्यात येत आहे. गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आशिष माने, उमेश म्हादये, होमगार्ड संदेश धावडे, अंकुश घाणेकर तसेच स्थानिक व्यावसायिक केतन धनावडे, रोहित चव्हाण, मुबारक सुतार आणि अनेक ग्रामस्थांनी बचाव व शोधकार्यात मोलाचे योगदान दिले.

या घटनेतील काही तरुण हे कुटुंबातील एकुलते एक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे. मान्सून काळात समुद्रातील प्रवाह अत्यंत वेगवान होत असल्याने पर्यटकांनी सुरक्षा सूचनांचे पालन करून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकाचा मृतदेह सापडला समुद्रात

गणपतीपुळे समुद्रात शनिवारी सकाळी बुडालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून उर्वरित चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पर्यटकांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शोधकार्यादरम्यान प्रेम अदमाने या युवकाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आला. उर्वरित चौघांचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासन, जीवरक्षक, कस्टम विभाग आणि मच्छीमारांच्या बोटींच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून असून समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीतही शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. वाढलेला समुद्री प्रवाह आणि उंच लाटा यामुळे बचाव व शोधकार्यात अडचणी येत आहेत. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मान्सून काळात समुद्रात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उर्वरित चौघांचा शोध लागावा यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news