

जयंत धुळप
रायगड ः भारताच्या पश्चिम किनार्यावर वारंवार येणारी तीव्र चक्रीवादळे आणि माशांच्या संख्येत घट यांचा थेट संबंध शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे. सागरी परिसंस्था विस्कळीत होण्यामागे समुद्राचे तापमान वाढणे हे या अतिरेकी हवामान घटनांचे प्रमुख कारण आहे, असेही संशोधनातून सिद्ध झाले आहे. दरम्यान, मोंथा चक्रीवादळामुळे मच्छीमारांना त्यांचे महत्त्वाचे ऐन हंगामातील 22 ते 23 दिवस गमवावे लागले आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चक्रीवादळांमुळे सागरी जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे पर्यावरणाचा र्हास होतो आणि किनारी भागांसाठी नैसर्गिक रक्षक म्हणून काम करणार्या खारफुटीसारख्या महत्त्वाच्या परिसंस्थांना नुकसान पोहोचते. नुकतेच मोंथा चक्रीवादळ थेट महाराष्ट्राला धडकले नाही, तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम (विशेषतः खवळलेल्या समुद्राच्या परिस्थितीमुळे) मासेमारीवर झाले आहेत. हा निष्कर्ष रत्नागिरी येथील शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या सागरी जीवशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी आपल्या संशोधनातून काढला आहे.
‘मोंथा’ चक्रीवादळ ः मुख्य मुद्दे
‘सुंदर’ किंवा ‘सुगंधी फूल’असा मोंथाचा अर्थ. हे नाव थायलंडने दिले आहे. उगम : 24 ऑक्टोबर 2025 रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे क्षेत्र पुढे तीव्र होत 26 ऑक्टोबरला खोल दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले.
- तीव्रता व गती
वार्याचा वेग 80,100 कि.मी./ताशीपर्यंत वाढला. नंतर हे तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होऊन 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर धडकले. धडकतेवेळी वार्याचा वेग सुमारे 110 कि.मी./ताशी होता. समुद्र ‘खूप उग्र ते अत्यंत उग्र’ असा झाला.
- महाराष्ट्रावरील परिणाम
थेट महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकले नाही. तरीही खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीवर गंभीर परिणाम झाला. मच्छीमारांना किनार्यावरच थांबावे लागले. उरण किनार्यावरून काही बोटी आणि कर्मचारी बेपत्ता झाल्याची नोंद.
- कोकण किनारपट्टीवरील परिणाम
रत्नागिरी, जयगड, देवगड, मुरुड, अलिबाग, रेवस आणि उरण बंदरात मासेमारांनी बोटी नांगरून ठेवल्या. सुरक्षिततेसाठी खोल समुद्रातील मासेमारी तात्पुरती थांबवली.
बोंबिल, पापलेट, कोळंबी, लॉबस्टर मत्स्य साठ्यात घट
मोंथा चक्रीवादळापूर्वीही वारंवार होणार्या हवामान बदलांच्या घटना आणि सागरी जैवविविधतेचे होणारे नुकसान यामुळे महाराष्ट्रातील मासेमारीत लक्षणीय घट झाली होती. आता मोंथामुळे बोंबिल, पापलेट, कोळंबी, लॉबस्टर आदी प्रजातींचे मासेमारीचे साठे आणखी कमी होत आहेत. त्यातच अरबी समुद्र आणि हिंदी महासागराचे तापमान वेगाने वाढत आहे. परिणामी, चक्रीवादळांची वारंवारता आणि तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात मासेमार समुदायांना अधिक अडचणी येतील.
तापमानवाढीमुळे जैवविविधतेला धोका
हवामान बदलामुळे अरबी समुद्रात तापमानवाढ आणि तीव्र हवामानामुळे दीर्घकालीन मत्स्यसंपत्ती आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. वादळी लाटांमुळे आणि मुसळधार पावसामुळे किनारी भागांत पाणी भरल्याने जमिनीवरील मासेमारीच्या पायाभूत सुविधा (लँडिंग जेट्टी आणि साठवण क्षेत्रे) नष्ट होऊ शकतात. पूर आणि धूप यामुळे सागरी जीवांसाठी किनार्यावरील प्रजनन क्षेत्रांना धोका निर्माण होतो.