

रायगड ः बंगालच्या उपसागरामध्ये अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवारी रात्री मोंथा चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यावर आज सागरी किनारपट्टीत फारसा परिणाम दिसून आला नाही. मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता होती,मात्र मोठ्या लाटा भरतीच्यावेळी दिसून आल्या नाहीत. रायगड जिल्ह्यात मंगळवारी (28 ऑक्टोबर) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस झाला. मात्र वाऱ्याचा वेग मर्यादीतच होता.
खोल समुद्रतील मोठ्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर दक्षतेची उपाययोजना म्हणून सागरी मच्छिमारी बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 2 हजार 974 मच्छिमारी बोटी रेवस ते श्रीवर्धनच्या बंदरांत सुखरुप थांबलेल्या आहेत. रायगडच्या समुद्रात एकही मच्छिमार बोट नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
मांडवा ते मुंबई गेटवे या सागरी मार्गावरील प्रवासी बोट सेवा मंगळवारी पूर्णपणे बंद होती. तर उद्या बुधवारी देखील ही बोट सेवा बंद राहाणार आहे. मात्र रो-रो बोट सेवा सूरु होती अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मांडवा येथील बंदर अधिकारी आशीष मानकर यांनी दिली आहे.
दरम्यान मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस आणि मुंबई-घारापुरी या तिन्ही सागरी मार्गांवरील प्रवासी बोटींची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. प्रवासी बोट सेवा बंद राहील्याने रायगडमधून मुंबईत नोकरी व व्यवसायाकरिता जा-ये करणारे नागरिक आणि पर्यटक यांचे मोठे हाल झाले. परिणामी एसटी बस सेवेवरील ताण गेल्या तिन दिवसांपासून वाढला असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या सुत्रांनी दिली आहे.
मोंथा चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीला धडकण्याची शक्यता
मोंथा चक्रीवादळ आज (मंगळवार, दि. 28) आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकणार असल्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात याचा विशेष परिणाम होणार नाही. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्राने दिशाबदल केला असून, ते आता उत्तर-पूर्वेकडे सरकत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी रात्री दक्षिण गुजरातच्या परिसरात, विशेषतः सुरतजवळ धडकण्याची शक्यता आहे.
या प्रणालीच्या परिणामामुळे उत्तर कोकणात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या हवामानातील बदलामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन कोकणातील सर्व जिल्हा प्रशासनांनी केले आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या संभाव्य चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उरण तालुक्यातील करंजा आणि मोरा बंदरात सुमारे 250 हून अधिक मासेमारी बोटी सुरक्षितरित्या नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.मासेमारीसाठी निघालेल्या बोटींना वादळामुळे माघारी यावे लागल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रत्येक बोटीमागे डिझेल, बर्फ, जीवनावश्यक वस्तू आणि इतर तयारीवर केलेला खर्च वाया गेला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून ही जवळपास नववी वेळ आहे, जेव्हा वादळामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे मच्छीमार हवालदिल झाले असून, त्यांना शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मच्छीमारांना वर्षभरात अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
पावसाळ्यातील 60 दिवसांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला असला तरी, यंदा खराब हवामान आणि वादळांच्या वारंवार येणाऱ्या इशाऱ्यांमुळे हवामान विभागाने आतापर्यंत आठ वेळा धोक्याचा इशारा दिला आहे. परिणामी, मच्छीमारांना किमान 20 ते 22 दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली आहे.
पाऊस आणि वादळी हवामान 2 नोव्हेंबर पर्यंत राहाणार
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. तर 30 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 31 ऑक्टोबर आणि 01 नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मोंथा चक्रीवादळाचा परिणामस्वरुप पाऊस आणि वादळी हवामान 2 नोव्हेंबर पर्यंत राहाणार असल्याचे सागर पाठक यांनी पूढे सांगीतले. अरबी समुद्रातील तीव्र दाबाच्या या क्षेत्रामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 5 नोव्हेंबरनंतर हळूहळू थंडी वाढायला सुरू होईल, असा अंदाज आहे.