

खांदा कॉलनी: पनवेल व नवी मुंबई परिसरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित लेडीज डान्स बारविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून हे बार कायमचे बंद करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर काही महिन्यांपूर्वी पनवेलमधील नाईट रायडर्स बारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाला दिलेली मुदत संपूनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.
रायगडच्या प्रवेशद्वारावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अशा प्रकारची संस्कृती खपवून घेतली जाणार नसल्याचे मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाला स्थानिक नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा मनसेने केला आहे. यापूर्वी अनेक आंदोलने होऊनही संबंधित बार काही दिवसांनी पुन्हा सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यावेळी केवळ आंदोलन न करता कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ऑर्केस्ट्रा परवान्याच्या आडून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे कार्यक्रम, पैशांची उधळण आणि त्यामुळे बिघडणारे सामाजिक वातावरण याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत.
पोलीस कारवाईकडे लक्ष
मनसेने आता आमरण उपोषणाचे अस्त्र उपसल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले असून या प्रश्नावर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पनवेल परिसरातील डान्सबार नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. आजही मोठ्या प्रमाणात ते सुरू असून, दररोज कोट्यवधींचा चुराडा होत आहे. कारवाईचे केवळ फार्स केले जात आहेत. त्यामुळे या कारवाईकडे लक्ष आहे.