Snakehead Fish: धरमतर खाडीत 'मरळ' माशांचा सुळसुळाट; पारंपरिक मासे धोक्यात, पण अर्थार्जनाची मोठी संधी

अत्यंत पौष्टिक माशाच्या व्यावसायिक विक्रीकडे दुर्लक्ष
Snakehead Fish
Snakehead FishPudhari
Published on
Updated on

जयंत धुळप

रायगड: धरमतर खाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात 'मरळ' (स्नेकहेड फिश) माशांची संख्या वाढली आहे. हे मासे अत्यंत पौष्टिक असून बाजारात त्यांना तब्बल ६०० रुपये प्रति किलो असा उच्चांकी भाव मिळतो.

मात्र, हे मासे खाडीत इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही स्थानिक मच्छिमारांकडून त्यांना पकडून त्यांची व्यावसायिक विक्री केली जात नाही. यामुळे मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान तर होत आहेच, पण खाडीतील जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे.

Snakehead Fish
Pali Nagarpanchayat Election: पाली न.पं. पोटनिवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; प्रभाग १३ मध्ये स्वप्नाली जाधव विजयी

अलिबाग तालुक्यांतील चरी गावचे प्रयाेदशिल शेतकरी व मत्स्य अभ्यासक प्रमोद जाधव यांनी यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. मरळ हा मांसाहारी मासा आहे. खाडीत ते पकडले जात नसल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे मांसाहारी मासे खाडीतील इतर लहान आणि पारंपरिक माशांना आपले भक्ष्य बनवतात.

परिणामी, धरमतर खाडीतील जितेडा, बोई (बोयट), कोळंबी, निवटी, तांब, मुळस, भिंग आणि खाडीतील सरंगा (पॉम्फ्रेट) यांसारखे स्थानिक आणि पारंपरिक मासे झपाट्याने कमी होण्याची गंभीर समस्या आता समोर आली आहे.

Snakehead Fish
Accident News: मुंबई-वडोदरा हायवेवरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; बीएमडब्ल्यू गाडीचा चक्काचूर

मच्छिमारांनी या माशांची व्यावसायिक मासेमारी केल्यास खाडीतील इतर माशांचे रक्षण होईल आणि मच्छिमारांना मोठी आर्थिक प्राप्तीही होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मरळ हा अत्यंत आक्रमक आणि पूर्णपणे मांसाहारी मासा आहे. तो लहान मासे, बेडूक, खेकडे आणि इतर जलचरांना खाऊन जगतो. खाडी किंवा तलावातील अन्नसाखळीत तो सर्वोच्च भक्षक म्हणून काम करतो.

मरळ हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन (प्रथिने), ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मुबलक प्रमाणात अमिनो ॲसिड असतात. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी तसेच हाडांच्या मजबुतीसाठी हा मासा खाण्याचा सल्ला दिला जातो. यात काट्यांचे प्रमाण कमी असल्याने लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हा उत्तम आहार ठरतो.

स्थानिक बाजारात आणि शहरांमध्ये मरळ माशांना मोठी मागणी आहे. ६०० रुपये किलोचा भाव पाहता, धरमतर खाडीतील मच्छिमारांनी पारंपरिक मासेमारीसोबतच मरळ माशांच्या मासेमारीवर लक्ष केंद्रित केल्यास, यातून किनारपट्टी भागातील अर्थकारणाला मोठी गती मिळू शकते. यामुळे खाडीतील नैसर्गिक समतोल राखण्यास तसेच खाडीचे वैभव असणाऱ्या जितेडा आणि बोईसारख्या पारंपरिक माशांचे संवर्धन करण्यासही मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.

'स्नेकहेड फिश'

मरळ माशाला इंग्रजीत 'स्नेकहेड फिश'असे म्हणतात, कारण त्याचे डोके काहीसे सापासारखे चपटे असते. त्याचे शरीर लांबट, दंडगोलाकार आणि काळपट- तपकिरी रंगाचे असते, ज्यावर विशिष्ट ठिपके किंवा पट्टे असतात. या माशाकडे एक विशेष अतिरिक्त श्वसन अवयव असतो, ज्यामुळे तो पाण्यात ऑक्सिजन कमी असताना किंवा पाण्याबाहेरही काही काळ हवेत थेट श्वास घेऊन जिवंत राहू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news