

म्हसळा : म्हसळा तालुका ग्रामीण रुग्णालयात नुकतीच बंद असलेली डायलिसिस सेवा लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येणार असून आरोग्य विभागाच्या स्तरावर सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत म्हसळा तालुक्यातील डायलिसिसच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तीन डायलिसिस मशीनच्या माध्यमातून सहा रुग्णांना नियमित डायलिसिस उपचार दिले जात होते.केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या आर्थिक सहाय्यातून ही सेवा सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने अचानक डायलिसिस सेवा बंद पडली.त्यामुळे नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांसमोर मोठा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की म्हसळा येथील डायलिसिस सेवा बंद होण्याचा प्रश्न केवळ एका रुग्णालयापुरता मर्यादित नसून केंद्र शासनाच्या निधीतून पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या राज्यातील डायलिसिस केंद्रांनाही अशाच प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. श्रीवर्धन, रोहा आणि माणगाव येथील डायलिसिस केंद्रे जिल्हा नियोजन निधीतून राज्य शासनाच्या माध्यमातून कार्यान्वित असल्याने तेथील सेवा सुरू आहेत.
म्हसळा येथील डायलिसिस सेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी आपण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. आरोग्य विभागाच्या स्तरावर यावर योग्य तोडगा काढण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान सेवा पूर्ववत सुरू होईपर्यंत म्हसळा तालुक्यातील रुग्णांना डायलिसिस उपचारांपासून वंचित राहावे लागू नये यासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाशी संपर्क साधून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन रुग्णांना श्रीवर्धन येथे डायलिसिस सेवा देण्यात आली असून उर्वरित तीन रुग्णांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.