

माथेरान : मिलिंद कदम
१५ ऑगस्ट शनिवारी आल्यामुळे सलग लागून आलेल्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने माथेरान आज फुल झाले असून येथे आलेल्या पर्यटकांना वाहतूक व्यवस्थे मुळे माथेरानमध्ये पोहोचण्याकरिता चार ते पाच तास उभे राहावे लागल्याने आगामी काळातील पर्यटनावर याचा निश्चितच परिणाम होणार आहे.
माथेरान हे एक छोटे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सहा ते सात हजार पर्यटक राहण्याची क्षमता आहे परंतु आज माथेरान मध्ये पंधरा ते वीस हजार पर्यटक आल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण फज्जा उडाला असून नेरळ स्टेशन येथे टॅक्सीकरिता मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
पर्यटक टॅक्सी मिळण्याकरिता एक ते दीड तास रांगेमध्ये उभे होते तर घाटामध्ये ठीक ठिकाणी धबधब्यांवर भिजण्याकरिता पर्यटकांनी रस्त्यामध्येच गाड्या लावल्याने हा घाट पार करण्याकरता दीड ते दोन तास लागत होते. त्यानंतर माथेरानमध्ये पोहोचल्यावर मर्यादित रिक्षा व मिनीट्रेनच्या मर्यादित फेऱ्यांमुळे या ठिकाणीही दीड ते दोन तास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर अनेक पर्यटक चार ते पाच तासांचा प्रवास करून माथेरानमध्ये दाखल झाल्याने पुन्हा माथेरान नको रे बाबा असा त्यांचा सूर होता.
आज नेरळ माथेरान घाट रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे भविष्यामधील पर्यायी मार्गाची निकड पुन्हा एकदा समोर आली असून नेरळ माथेरान रस्त्याला पर्यायी रस्ता असणे आवश्यक झाले आहे. जेणेकरून पर्यटक दुसऱ्या मार्गाने माथेरानमध्ये दाखल होतील. धोधानी माथेरान फेन्युकुलर रेल्वे प्रकल्प झाल्यास वाहनतळ किंवा घाट रस्ता जाम होणे यासारखे प्रश्नच उद्भवणार नाही. परंतु शासन माथेरानकरिता पनवेल मार्गे रस्त्यासाठी अनुकूल का दिसत नाही, असा सवाल माथेरानमधील पर्यटन व्यावसायिकांचा आहे.
"आम्ही नेरळ येथे सकाळी दहा वाजता टॅक्सीसाठी रांगेत उभे होतो. प्रचंड गर्दीमुळे टॅक्सी मिळणार की नाही अशी भीती वाटत होती, हॉटेलवर पोहोचायला आम्हाला तीन वाजले. अर्धा दिवस आमचा नेरळ माथेरान प्रवासात खराब झाला. आता सलग सुट्ट्यांमध्ये माथेरान येथे येताना विचार करावा लागेल."
- मानवी मोदी, पर्यटक सुरत
"आम्ही दहा जणांचा ग्रुप आज सकाळी माथेरान मध्ये फिरावयास आलो होतो परंतु येथे पोहोचताना दुपार टळून गेली, महिला असल्याने येथे सार्वजनिक शौचालयांची चौकशी केली व पाहिले असता अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये ही शौचालय आहेत. माथेरानमध्ये प्रवासी कर घेतला जातो पण पावसामध्ये पर्यटकांना बसण्याकरिता व स्वच्छ शौचालयांचे व्यवस्थाच नाही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे."
- संगीता देसाई, नवी मुंबई