

ठाणे : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या १२ ऑगस्ट रोजी दुपारी जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विशेषतः रायगड तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार, तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होऊन मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट आणि सातारा घाट परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटात आज आणि १४ ऑगस्टला तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, सातारा घाटात पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
ठाणे जिल्ह्यात १३ आणि १४ ऑगस्टला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. १५ व १६ ऑगस्टला हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातही पावसाची संततधार
रत्नागिरी जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार, तर १३ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ ऑगस्टलाही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गातही पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.नाशिकच्या घाट भागात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित भागात आज मुसळधार, तर त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
कोल्हापूर घाटातही मुसळधार पाऊस
कोल्हापूरच्या घाट भागात १२ ते १५ ऑगस्टदरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, १६ ऑगस्टला मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र कोल्हापूरच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भात वादळी पावसाचा तडाखा
विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.