

रायगड: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १६ तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती आणि पावसामुळे हजारो कुटुंबे बाधित झाली असून, तब्बल ४ हजार ९१३ घरांमध्ये पाणी शिरल्याने संसाराची दैना उडाली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालानुसार, संपूर्ण जिल्ह्यात खाजगी व सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली असून सध्या युद्धपातळीवर नुकसानी पंचनामे सुरू आहेत.
नुकसानीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पेण तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसते. पेणमध्ये १,८१६ घरांमध्ये पाणी शिरले असून ६४२ कच्ची घरे आणि २ पक्की घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच ४३७ कारखान्यांचेही येथे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल उरण व पनवेल परिसरात १,०६९ घरांमध्ये, तर रोहा तालुक्यात १,०४८ घरांमध्ये पूरपाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अलिबाग तालुक्यात ५५ पक्की घरे आणि ४ कच्ची घरे अंशतः बाधित झाली आहेत. येथे २०० घरांमध्ये पाणी शिरले असून ५ दुकानांचे नुकसान झाले आहे, तसेच ५ गोठे आणि ३ पोल्ट्री फॉर्मचेही नुकसान झाले आहे. मुरुड तालुक्यात ८० पक्की घरे अंशतः बाधित झाली असून ५२ घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर १ दुकान आणि ५ गोठ्यांचे नुकसान नोंदवले गेले आहे.
पेण तालुक्यात २ पक्की घरे पूर्णतः नष्ट झाली आहेत. ६४२ कच्ची घरे आणि २ पक्की घरे अंशतः बाधित झाली असून सर्वाधिक १,८१६ घरांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय १५ दुकाने, ७ पोल्ट्री आणि तब्बल ४३७ लघुद्योग किंवा कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पनवेल ग्रामीण भागात २ पक्की व ५ कच्ची घरे बाधित झाली असून ८२ घरांत पाणी शिरले आहे. आपटा (अप.) परिसरात २५ पक्की व १८ कच्ची घरे बाधित झाली असून ४२ घरांत पाणी शिरले आणि १ पोल्ट्रीचे नुकसान झाले. उरण परिसरात १५ पक्की आणि १ कच्ची घर बाधित असून १,०६९ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद आहे.
कर्जत तालुक्यात २० पक्की व २५ कच्ची घरे बाधित झाली असून ७१ गोठे व झोपड्यांचे आणि ४३ घरांचे नुकसान झाले आहे. खालापूर तालुक्यात २२ पक्की घरे आणि ६ कच्ची घरे बाधित होऊन २९५ घरांमध्ये पाणी शिरले असून १ पोल्ट्री फॉर्मचे नुकसान झाले आहे.
रोहा तालुक्यात २२० पक्की घरे अंशतः बाधित झाली असून १,०४८ घरांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे येथे ११४ दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर १४१ गोठे व ३ पोल्ट्रीचेही नुकसान झाले आहे. सुधागड तालुक्यात १ पक्के घर पूर्णतः नष्ट झाले असून ४६० पक्की घरे अंशतः बाधित झाली आहेत आणि ४३ घरांमध्ये पाणी शिरून ६ दुकानांचे नुकसान झाले आहे.
महाड तालुक्यात २५३ पक्की आणि १४२ कच्ची घरे बाधित झाली आहेत. येथे ७२ घरांत आणि ५९ दुकानांत पाणी शिरले असून ११ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यात ४६० पक्की आणि ९ कच्ची घरे बाधित झाली असून १५१ घरांत आणि २१ दुकानांत पाणी शिरले आहे, तसेच ३४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
३७ सार्वजनिक मालमत्तांना फटका; शाळा आणि मंदिरांचे नुकसान
पावसाच्या तडाख्यातून सार्वजनिक मालमत्ताही सुटलेल्या नाहीत, जिल्ह्यात एकूण ३७ सार्वजनिक ठिकाणी पडझड किंवा नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात सर्वाधिक २१ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून यात गोषाळा, सभागृह, आरोग्य केंद्र, शाळा व राईसमिलचा प्रामुख्याने समावेश आहे.
सुधागडमध्ये ४ तर खालापूरमध्ये २ सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यात ३ ठिकाणी नुकसान झाले असून यात स्मशानभूमी, सभामंडप आणि जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. महाडमध्ये विन्हेरे सुतारकोंड येथील २ शाळा, तर उरणमध्ये मुळेखड व नागाव येथील २ जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले आहे.
कर्जतमध्ये १ मंदिर, रोहा (बाळसई) येथे १ मंदिर आणि तळा येथे म्हसाडी जिल्हा परिषद शाळेचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही महसूल व स्थानिक प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. बाधित नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी अंतिम आकडेवारी व अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.