

माथेरान ः मिलिंद कदम
माथेरान मध्ये नगराध्यक्ष व प्रभाग रचना आरक्षण जाहीर झाल्यानंतर हळूहळू राजकीय वातावरणामध्ये बदल घडत असून इच्छुक उमेदवार आता कुठे हळूहळू बाहेर यायला लागली आहेत परंतु सर्वांच्या नजरा मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडे लागले असून कोण होणार माथेरानचा नगराध्यक्ष याबाबत येथील राजकीय पटलावर चर्चांना उधाण आले आहे.
यावेळेस प्रमुख लढत ही भाजपा अजित पवार राष्ट्रवादी गट व शिवसेना शिंदे गट यामध्येच रंगणार आहे परंतु उमेदवार कोण हे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरीही अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून माजी नगराध्यक्ष श्री. अजय सावंत हे मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे. परंतु त्यांच्यासमोर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे कारण शिवसेना शिंदे गटाकडून या पदासाठी दोन उमेदवारी इच्छुक असल्याने कर्जत खालापूरचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
माजी नगराध्यक्ष श्री मनोज खेडकर यांनी काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये प्रवेश करताना नगराध्यक्ष पद देणार असा शब्द आमदारांनी दिला होता व त्यावेळेस सर्वांनी त्यास होकार दिला होता परंतु आता माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी हे ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे दिसून येत असल्याने ही उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज खेडकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे तर श्री.चंद्रकांत चौधरी यांनी येथील अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यामुळे यावेळेस पक्षाने त्यांचा विचार करावा अशी ते अपेक्षा करीत आहेत व त्यासाठी त्यांनी मागील दोन वर्षांपासून पक्ष वाढीसाठी कंबर कसली होती.या दोन दिग्गजांमधून कोणाला निवडायचे हा आता मोठा पेच निर्माण झाला असून कोणाला एकाला झुकते माप दिल्यास त्याचा थेट फटका पक्षालाच होणार आहे ,त्यातूनही हा तिढा सुटला नाही तर राज्यातील महायुतीचा धर्म पाळत भाजपला लॉटरी लागण्याची शक्यता वाढत चालली आहे.
माथेरान चे नगराध्यक्ष पद भाजपला देऊन कर्जत खोपोली नगराध्यक्ष पदावर दावेदारी मजबूत करण्याची खेळीही खेळली जाऊ शकते .राष्ट्रवादी कडून अजय सावंत यांचे नाव निश्चित असून खा. सुनील तटकरे यांचे विश्वासू, सुधाकर घारे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनी सध्यातरी माथेरान मधून जनसंपर्क बाबतीत आघाडी घेतली असून येणाऱ्या काळात कार्यकर्त्याची जमवाजमव करून विजयाची मोट बांधण्याची त्यांची कला सर्वांनी पाहिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्री शकील शेख यांनी ही उमेदवारीचे संकेत दिले असल्याने रंगत अजून वाढणार आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना भाजपा मात्र अजून ह्या स्पर्धेत ताकदीनिशी उतरलेला दिसत नसून नगराध्यक्ष आमचाच हे सातत्याने सांगणारे शांत झाल्याचे पहावयास मिळाल्याने त्यांचा कल फक्त तडजोडी करण्यात आहे का असा प्रश्न सध्या राजकीय तज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. त्यांच्याकडून अजून ही नगराध्यक्ष पदाचा चेहरा समोर आलेला नाही,यामुळेही उलटसुलट चर्चा रंगत असून एकपेक्षा जास्त इच्छुक आहेत का? की निवडणुकीपूर्वी पक्ष फुटी थांबविण्यासाठी असे केले जात आहे किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठांच्या आदेशाने आयात उमेदवार भाजपा च्या झेंड्याखाली निवडणूक लढवणार अशी ही नागरिकांमध्ये चर्चा आहे. सध्या तरी माथेरान मधील राजकीय पक्षांमधील धूसपूस समोर येत असून येणाऱ्या काळात त्याचा फटका कोणत्या पक्षाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऐन मोसमातच निवडणुका
माथेरानमध्ये दिवाळीलाच पर्यटनाचा हंगाम सुरु होत असतो. त्याच मोसमात नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे.इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच आवश्यक साहित्यांची मागणीही वाढल्याचे जाणवत आहे.त्यामुळे येथील व्यावसायिक आतापासूनच सुखावलेले आहे.मतदारही सध्या आनंदित आहेत.