

Bombay High Court on Sale Of Herbal Hookah
मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट मालकांना निकोटीन किंवा तंबाखू नसलेला व्यवसाय चालवण्यास तसेच हुक्का विकण्यास मनाई नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. रेस्टॉरंट मालकांनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा व त्यात झालेल्या सुधारणांचे पालन करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी नोटीस न देता छापा टाकल्याने रेस्टॉरंट मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी रेस्टॉरंट मालकांचे व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आणि त्यांना हर्बल हुक्का देणे बंद करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांमध्ये क्रॉफर्ड मार्केट येथील उस्तादी, वांद्रे येथील द नेस्ट, फोर्ट येथील रस्टिको आणि काला घोडा येथील फहम रेस्टॉरंटचे मालक आणि संचालक यांचा समावेश होता. त्यांच्या याचिकेवर न्या. रियाज आय छागला आणि न्या. फरहान पी दुबाश यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. याचवेळी पोलिसांच्या कारवाईला खंडपीठाने ब्रेक लावला.
ऑगस्ट 2019 मध्ये हायकोर्टाने रेस्टॉरंट्सना हर्बल हुक्का विकण्याची परवानगी दिली असतानाही पोलीस कारवाईची धमकी देत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. रेस्टॉरंट्सवर बेकायदेशीर छापे तसेच धमक्या देण्याचे प्रकार त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली. ही विनंती खंडपीठाने मान्य केली.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील झुबिन भेरामकामदिन, ॲड. राजेंद्र राठोड आणि ध्रुव जैन यांनी युक्तिवाद केला.याचिकाकर्त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्का सेवा बंद करण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्याची नोंद खंडपीठाने घेतली. याचिकाकर्त्यांना रेस्टॉरंटचा व्यवसाय चालवण्यास किंवा हुक्का देण्यास मनाई नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट नमूद केले.