

माथेरान (रायगड): पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेला, येथील मुख्य आकर्षणांपैकी एक असलेला शार्लेट लेक तलावाचा ओव्हरफ्लो धबधबा आता पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या यशस्वी प्रयत्नांनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
माथेरानच्या पावसाळी पर्यटनात शार्लेट लेक येथील ओव्हरफ्लो धबधब्याला विशेष महत्त्व आहे. मान्सूनच्या काळात हा धबधबा पाहण्यासाठी आणि त्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात.
मात्र, यंदा स्थानिक प्रशासनाने अचानक हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्याने पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या निर्णयामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले होते, तसेच त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या व्यवसायावरही गदा आली होती. अनेक नागरिकांनी नगरपरिषदेच्या या नियोजनशून्य कारभारावर समाज माध्यमांवरून टीका केली होती.
या समस्येचे गांभीर्य ओळखून शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माथेरान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेतली. यावेळी चौधरी यांनी पावसाळी पर्यटनासाठी या धबधब्याचे महत्त्व प्रशासनाला पटवून दिले.
या बैठकीनंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. प्रशासक राहुल इंगळे यांनी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तलावाच्या सभोवताली योग्य ती खबरदारी घेऊन आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून हा धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन चंद्रकांत चौधरी यांना दिले. या निर्णयामुळे आता माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा एकदा शार्लेट लेकच्या प्रसिद्ध धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.