

Car Hits Trailer Raigad
खांब: मुंबई- गोवा महामार्गावर सोमवारी (दि.२३) रात्री दीडच्या सुमारास खांब हद्दीतील एचपी पेट्रोल पंप समोर कार उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकली. या अपघातात एकजण ठार झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
या अपघातात आदित्य दिपू वर्मा (वय ३८, रा. कमला देवी कॉलेज हेरीटेल, ठाणे) हे ठार झाले. तर निलेश राधानी (वय २५, रा. कल्याण), सिद्धेध योगेश शिंदे (वय २६, खडक पाडा, कल्याण वेस्ट), तसेच फिर्यादी अमित विजय करपे (रा. खडक पाडा, कल्याण वेस्ट) हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अमित विजय करपे (रा. खडक पाडा, कल्याण वेस्ट) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, सोमवारी रात्री दीड च्या सुमारास सिद्धेश योगेश शिंदे (खडक पाडा, कल्याण वेस्ट) हे (एमएच ०५/ई ए २५०५) कारने चिपळूण ते कल्याण प्रवास करत होते. मौजे खांब गावच्या हद्दीत येताच एच पी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला (एम एच ४६/बी यु ४०१४) पाठीमागून धडकले.
या घटनेची माहीती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अपघात ग्रस्तांना स्थानिक रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मदत केली. कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोसई गायकवाड करीत आहेत.