.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Raigad Rains Updates
रायगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि.२४ जून) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील रोहा आणि गुहागर तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीची इशारा पातळी २३ मीटर असून सध्या ती २३.९५ मीटरपर्यंत पोहोचली आहे. तर पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर आहे. सध्या तिची पाणी पातळी २०.६० मीटरवर गेली आहे. सावित्री, अंबा, उल्हास आणि गाढी नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. या दोन जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पुढील २ ते ३ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी पुढील तीन दिवस अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर विदर्भात वादळी वार्यायासह पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.