

माणगाव (रायगड) : माणगाव - इंदापूर परिसरातील नागरिक, व्यावसायिक, प्रवासी व पर्यटक यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी ठरली आहे. इंदापूर व माणगाव येथील बायपास रस्त्यांची कामे रखडल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच महामार्गावरील वाहन धारकांना वारंवार प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पर्यायी मार्गाचा शोध अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी दोन दिवसांपूर्वी रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास राज्यमंत्री ना. भरत गोगावले यांना लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनात वाढवण - कालवण - दाखणे - नाणोरे - माणगाव या कालवा मार्गाचा उल्लेख करत, तो पर्यायी मार्ग म्हणून वापरल्यास माणगावातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, अशी ठोस भूमिका मांडण्यात आली होती. या निवेदनाची तातडीने दखल घेत मंत्री भरत गोगावले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांना 26 ऑगस्ट रोजी अधिकृत पत्र पाठवून या कालवा मार्गाचा प्रस्तावित रस्त्यांच्या कामांमध्ये समावेश करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
गोगावले यांनी स्पष्ट केले की, या मार्गाचा कांही भाग डांबरीकरण झालेला आहे, तर उर्वरित भागाचे काम पूर्ण झाल्यास हा रस्ता सुरक्षित व सोयीस्कर पर्याय ठरेल. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच पर्यटक व व्यावसायिकांना अखंडित व वेगवान वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत होत असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आता ठोस मार्ग निघण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मंत्र्यांनी घेतलेल्या या तातडीच्या दखलीमुळे माणगाव - इंदापूर परिसरातील विकास प्रक्रियेला गती मिळणार असून, शासनाचा वेगवान निर्णयप्रक्रियेवर विश्वास अधिक दृढ होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षी सण-उत्सव, सुट्टीचा हंगाम, लग्नसराई तसेच सतत वाढणार्या पर्यटकांच्या गर्दीमुळे भीषण वाहतूक कोंडी निर्माण होते. गौरी गणपती, होळी, दीपावली किंवा उन्हाळा सुट्टी - कोणताही काळ असो, या महामार्गावर नागरिकांना तासन्तास वाहनांच्या रांगांमध्ये अडकून बसावे लागते. या परिस्थितीत प्रवासी, व्यापारी, पर्यटक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इंदापूर व माणगाव येथील बायपासचे काम रखडले असल्याने हा प्रश्न सुटण्यास अजून काही कालावधी लागणार आहे. मात्र दररोजच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिक, पर्यटक, प्रवाशांनी याचा पर्याय सुचवला आहे. इंदापूर-वाढवण-पाणसई-कालवण-दाखणे-मुंढेवाडी-नाणोरे-माणगाव हा कालवा मार्ग तातडीने डांबरीकरण करून कार्यान्वित झाल्यास माणगावातील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येऊ शकते.