

मुंबई: मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे यांचे २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. बुधवारी दि.२७ रोजी 'चलो मुंबई' असा नारा देत, अंतरवाली सराटीतून महारॅलीस प्रारंभ करण्यात आला. मराठा आरक्षणाची रॅलीची मुंबईच्या दिशेने वाटचाल चालूच आहे. दरम्यान जुन्नर-चाकण महामार्गावर प्रचंड गर्दी झाली असून, वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उद्या शुक्रवारी (दि.२९) मुंबईत येत आहेत. तरी देखील हजारो कार्यकर्ते आज (दि.२८) संध्याकाळपर्यंत आझाद मैदानात जमा होतील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर पुणे - मुंबई हायवेवरील काही हॉटेल मालकांकडून जरांगे समर्थकांच्या गाड्यांना जागोजागी मोफत जेवण दिलं जात आहे. जरांगे समर्थकांच्या गाड्यांच्या गर्दीचा परिणाम वाहतूकीवर प्रचंड झाला आहे. दरम्यान मुंबई महामार्गावर चाकण परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी (दि.२७) वाहतूकी बदल केले आहेत. आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे महामार्गावर कोंडी होऊ नये म्हणून पळस्पे–गव्हाणफाटा–पामबीच मार्गे वाशी हा मार्ग त्यांच्या वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.या काळात इतर वाहनांना मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, जेएनपीटी मार्ग, पळस्पे–डि पॉइंट, गव्हाणफाटा परिसर, तसेच वाशी प्लाझा व वाशी रेल्वे स्थानकाजवळून प्रवेश बंदी राहील. हलकी व दुचाकी वाहने मात्र पर्यायी मार्गाने जाऊ शकतील. आपत्कालीन सेवा वाहनांना या बंदीतून सूट दिली आहे. वाहनचालकांनी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी दिलेले पर्यायी मार्ग वापरावेत, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
मुंबईत होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंबई पोलिसाची तयारी सुरू केली. सर्व पोलिस फोर्स मिळून १५०० च्या आसपास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गरज भासल्यास अतिरिक्त पोलिस फोर्स मागवण्यात येईल. आझाद मैदान परिसरात २०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. आझाद मैदान परिसरात ५ डीसीपी आणि त्यापेक्षा पुढील दर्जाचे अधिकारी तैनात असतील. यासोबतच दंगल नियंत्रण पथक, अग्नीशमन पथकसुद्धा तैनात असणार आहे अशी माहिती मिळत आहे.