kerosene shortage: अपुऱ्या केरोसीनने तोंडाला पुसली पाने

माणगावात 38 हजार कुटुंबांना 9 हजार लि. केरोसीन म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे
kerosene shortage
kerosene shortagePudhari
Published on
Updated on

कमलाकर होवाळ

माणगाव: युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईने होरपळलेल्या माणगाव तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तब्बल तीन महिन्यांनंतर केरोसीन पाठवले खरे, मात्र ते इतके तुटपुंजे आहे की त्यामुळे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले आहे.

तालुक्याला आवश्यक असलेल्या तुलनेत केवळ 9,000 लिटर केरोसीन प्राप्त झाले असून, 38,606 रेशन कार्डधारक आहेत. या शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबांची तहान भागवणे वितरकांसाठी एक न सुटणारे कोडेच बनले आहे.

kerosene shortage
Shiv Sena vs NCP: रायगडात पुन्हा तटकरे विरुद्ध गोगावले संघर्षाचा भडका?

युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस, पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी शासन निर्णय (जीआर) काढला होता. त्यानुसार प्रत्येक रेशन कार्डधारकाला तीन लिटर केरोसीन देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश जारी होऊन तब्बल तीन महिने उलटूनही माणगाव तालुक्यात केरोसीनचा थेंबही पोहोचला नव्हता.

अखेर नुकतेच 9,000 लिटर केरोसीन तालुक्यात दाखल झाले. परंतु ज्या उद्देशाने हा जीआर काढला होता, तो उद्देशच या विलंबामुळे आणि तुटपुंज्या पुरवठ्यामुळे धुळीस मिळाला आहे. शासनाचे काम आणि तीन महिने थांब या म्हणीचा प्रत्यय माणगावकरांना पुन्हा एकदा आला आहे.

पावसाळा हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नेहमीचेच. दिव्यासाठी, स्वयंपाकासाठी केरोसीनची गरज त्यावेळी कित्येक पटींनी वाढते. शिवाय पावसात लाकडे आणि गोवऱ्या भिजल्यामुळे पेटत नाहीत, त्यामुळे त्या पेटवण्यासाठीही केरोसीनचा आधार घ्यावा लागतो.

अशा परिस्थितीत हे अपुरे केरोसीन म्हणजे नागरिकांची डोकेदुखी अधिकच वाढवणारे ठरत आहे. पावसाळ्यात केरोसीनचा प्रश्न आणखी तीव्र बनणार आहे, याची चाहूल आत्तापासूनच लागली आहे. युद्धजन्य परिस्थितीची तीव्रता काहीशी ओसरली असली तरी त्याचे चटके मात्र सर्वसामान्य नागरिकांना अजूनही सोसावे लागत आहेत.

डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचे भाव गगनाला भिडलेलेच आहेत. स्वयंपाकाचा गॅस मिळेनासा झाल्याने अनेक नागरिकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ग्रामीण भागात हे थोडेफार शक्य असले तरी शहरी नागरिकांचे जगणे मात्र खरोखरच कठीण बनले आहे.

हॉटेल व्यावसायिक तर पुरतेच अडचणीत सापडले आहेत. इंधन नाही, गॅस नाही, दर परवडत नाहीत अशा तिहेरी संकटात हा व्यवसाय अडकला आहे. अनेक लहान हॉटेल व खानावळी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

kerosene shortage
Raigad farming cost increase: ऐन हंगामात महागाईमुळे शेतकरी हवालदिल

माणगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र संताप उसळत आहे. “आम्हाला न्याय हवा, केरोसीन हवे“ असा सूर सर्वत्र उमटत आहे. तालुक्याला तातडीने अधिकचे केरोसीन उपलब्ध करून द्यावे, अशी रास्त मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शासनाची केवळ आदेश काढून जबाबदारी संपत नाही, तर तो प्रत्यक्षात पोहोचवण्याचीही जबाबदारी घ्यावी, असा स्पष्ट संदेश माणगावकर देत आहेत.

1,15,818 लिटर केरोसीनची आवश्यकता

माणगाव तालुक्यात 38,606 रेशन कार्डधारक आहेत. शासनाच्या नियमा नुसार प्रत्येक रेशनकार्ड धारकाला तीन लिटर केरोसीन द्यायचे झाल्यास तालुक्याला किमान 1,15,818 लिटर केरोसीनची आवश्यकता आहे. शासनाने प्रत्यक्षात केवळ 9,000 लिटर 25 शासनमान्य केरोसीन विक्रेत्यांना वितरित केले. या परिस्थितीत वितरकांपुढे एकच प्रश्न आहे.

इतक्या कमी केरोसीनचे वितरण शिधापत्रिका धारकांना करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. माणगाव पुरवठा विभागाने तालुक्यातील केरोसीन परवानाधारकांना वितरणासाठी इच्छुकांनी मागणी नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी केवळ 25 परवाना धारकांनी मागणी नोंदवली आणि त्यांना उपलब्ध केरोसीनचे वितरण करण्यात आले. प्रति लिटर 63.99 रुपये हा शासनमान्य दर असला तरी मिळणाऱ्या प्रमाणावर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news