Shiv Sena vs NCP: रायगडात पुन्हा तटकरे विरुद्ध गोगावले संघर्षाचा भडका?

रायगड विधान परिषदेत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रस्सीखेच पाहायला मिळत असून शिवसेना देखील या जागेसाठी अडून बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Shiv Sena vs NCP
Shiv Sena vs NCPPudhari
Published on
Updated on

महाड: रायगडसह कोकणामध्ये शिवसेनेचीच ताकद असून संख्याबळ देखील शिवसेनेचेच आहे त्यामुळे विधान परिषद आमदारकी शिवसेनाच लढवणार,कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

रायगडच्या पालक मंत्रीपदासह विधानपरिषद आमदार सुद्धा आमचाच होणार, असा निर्धार शिवसेनेचे रायगड जल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी रायगड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.

Shiv Sena vs NCP
Raigad farming cost increase: ऐन हंगामात महागाईमुळे शेतकरी हवालदिल

रायगड विधान परिषदेत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रस्सीखेच पाहायला मिळत असून शिवसेना देखील या जागेसाठी अडून बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अर्थातच खासदार सुनील तटकरे विरुद्ध मंत्री भरत गोगावले यांच्यातील संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर आता भडक्यात झाल्याचे दिसत असून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला ही जागा बहाल करायची नाही असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर महाड येथील कांगोरीगड या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून विकास गोगावले हेच रायगड विधान परिषदेचे आमदारकीचे उमेदवार असतील अशी ठाम भूमिका एकमुखाने घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेतून नितीन पावले, सुरेश महाडिक, नीलिमा घोसाळकर, विजय सावंत या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना सातत्याने अन्याय सहन केला जाणार नाही असे सांगत “महायुतीचा धर्म फक्त शिवसेनेनेच पाळायचा का?“ असा सवाल उपस्थित केला.

Shiv Sena vs NCP
Raigad Congress crisis: महेंद्र घरत यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी; घरत यांना हटवल्याने रायगड काँग्रेसमध्ये बंड

त्याचप्रमाणे सद्यस्थितीत शिवसेनेचे रायगड जिल्ह्यासह कोकणात असलेले पक्षीय बलाबल हे राष्ट्रवादी आणि भाजप पेक्षा देखील जास्त असून एक नंबरचा पक्ष हा शिवसेना,दोन नंबरचा भाजप तर तीन नंबरचा पक्ष हा राष्ट्रवादी असल्याचे सांगण्यात आले, आणि याला अनुसरून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला ही जागा न सोडण्याचा निर्णय घेण्याची भूमिका मांडली.

कोकणातील नेते उदय सामंत, योगेश कदम, निलेश राणे यांच्याशी देखील याविषयी चर्चा करणार असल्याचेघोसाळकर यांनी सांगितले असून वरिष्ठ पातळीवर लवकरच आमची भूमिका मांडली जाईल असे सांगितले आहे. जर पक्षश्रेष्ठींनी विरोध दर्शवला तर आम्ही अपक्ष फॉर्म भरून ही निवडणूक लढवू मात्र माघार घेणार नाही, असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत निक्षून सांगितले.

या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या समवेत नितीन पावले, नीलिमा घोसाळकर, सुरेश महाडिक, प्रेरणा सावंत, राजू देशमुख, सपना मालुसरे,विद्या देसाई,डॉ. चेतन सुर्वे, पप्या अंबावले, सिद्धेश पाटेकर,इम्रान पठाण त्याचप्रमाणे शिवसेना, युवासेना महिला आघाडी, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसैनिकांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता रायगड विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अंतिम टप्प्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेच्या वेळी निर्माण झालेल्या या पेचामुळे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

शिवसेनेने उमेदवारीची मागणी केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या मतदार संघात मागील निवडणुकीत एकत्रित काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे विजयी झालेले होते.त्यामुळे या मतदार संघावर आमचाच अधिकार असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपनेही या मतदार संघातून उमेदवारी मिळावी,अशी मागणी केलेलीआहे.

पालकमंत्रीपदासह विधान परिषद आमदार पण आमचाच ः प्रमोद घोसाळकर

पत्रकारांना उत्तर देताना प्रमोद घोसाळकर यांनी देखील प्रत्येक वेळी मंत्री भरत गोगावले यांच्या शांत,संयमी आणि सहकारी भूमिकेमुळे सातत्याने त्यांच्यावर अन्याय होत आल्याचे नमूद करत पालकमंत्री पदाची तडजोड करून राष्ट्रवादीच्या वाटयाला रायगड विधान परिषद दिली जाईल अशा पद्धतीच्या चर्चांना पूर्णविराम देत, कोणत्याही परिस्थितीत अशी तडजोड केली जाणार नाही अशी ठाम भूमिका तर मांडलीच परंतु “पालकमंत्री पद पण आमचेच आणि विधानपरिषद आमदारकी पण आमचीच“अशी आरपार भूमिका घेतल्याने शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news