

माणगाव :माणगावकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार तथा राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी १७ नोव्हेंबर रोजी लेखी निवेदन देऊन मंत्री पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधले आहे.
माणगाव येथील हि काळ नदी तालुक्यातील जनतेची जीवनवाहिनी आहे. या नदीवर तालुक्यातील अनेक गावांतील नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यातच या भागातील गरीब शेतकरी राजा उन्हाळ्यात कलिंगड, भाजीपाला यांसारखी विविध उत्पादने घेत असतात. यावर्षी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच कोकणात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाई अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे.
माणगावच्या काळनदीचे पात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्याने अनेकठिकाणी गावागावांतून बंधारे टाकण्याचे काम सुरु आहे. त्यातच माणगावच्या काळनदीचे पात्र आटल्याने शहरातील व आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याच्याबाबतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काळनदीचे पात्र आटल्याने या नदीच्या पाण्यावर पिवळसर, हिरवा, नारंगी तवंग भरपूर प्रमाणात जमा झाल्याने आज घडीला हि नदी प्रदूषित झाली आहे. माणगाव नगरपंचायतीतर्फे नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी तमाम माणगावकर नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
या माणगाव काळ नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत मतदार संघाचे आमदार तथा राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन या गंभीर प्रश्नाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याच्या पर्यावरणीय मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, माणगाव तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या काळ नदीचे पाणी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नदीच्या पाण्यावर माणगाव शहरासह परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. नदीच्या पृष्ठभागावर हिरवट, पिवळसर व लालसर तवंग दिसून येत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.
प्रदूषणाबाबत सविस्तर चर्चा करण्याची मागणी
नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी, बांधकामांमधील सिमेंटमिश्रित पाणी, रासायनिक घटक, प्लास्टिक व इतर कचरा यामुळे प्रदूषण वाढत असल्याची शक्यता आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन नदीच्या पाण्याची तातडीने वैज्ञानिक तपासणी करणे, प्रदूषणाचे स्रोत निश्चित करून ते बंद करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे तसेच संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे. तरी काळ नदीच्या प्रदूषणाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी तसेच नदीचे पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यासाठी तात्काळ आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करावे आणि सदर बैठकीस मला देखील निमंत्रित करावे अशी विनंती मंत्री आदिती तटकरे यांनी या निवेदनातून केली आहे.