

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची वक्रदृष्टी आता २७ गावांतील अतिक्रमणांवर पडली आहे. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या निळजे-लोढा परिसरात केडीएमसीच्या अतिक्रमणविरोधी पथकाने २०५ दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि प्रोजेक्शन्सवर कारवाई करून ३० हजार ७५० चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त केला आहे. केडीएमसीच्या या कारवाईमुळे कोंडमारा झालेल्या परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत डोंबिवली निळजे- लोढा परिसरातील डाव्या बाजूस आंबेडकर चौक ते काळुबाई चौक, भवानी चौक, शिवाजी चौक ते गावदेवी चौक या मार्गावर अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त उमेश यमगर व सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. या मोहिमेस महापालिका मुख्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथक तसेच ब आणि ई प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाने सक्रिय सहकार्य केले.
परिसरातील अनेक व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या दुकानांसमोरील सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे वाढीव शेड, प्रोजेक्शन्स व इतर बांधकामे करून सार्वजनिक पदपथ तसेच रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत असत. तसेच रस्त्यावरील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. परिसरातील त्रस्त रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने सदर विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २०५ दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दुकानांसमोरील अनधिकृत वाढीव शेड्स, प्रोजेक्शन्स, वाढीव बांधकामे तसेच सार्वजनिक पदपथ व रस्त्याच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
सदर कार्यवाहीत ३० हजार ७५० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटवून सार्वजनिक जागा मोकळी केली. या कारवाईमुळे संबंधित मार्गावरील पदपथ अधिक मोकळे झाले असून, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. तसेच रस्त्यावरील अडथळे दूर होऊन वाहतुकीची सुरळीतता राखण्यास मदत होणार आहे.
अतिक्रमण आढळल्यास तत्काळ कारवाई
केडीएमसीकडून सार्वजनिक रस्ते, पदपथ व इतर सार्वजनिक जागा नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी अडथळामुक्त ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. कोणत्याही व्यावसायिक आस्थापनांनी दुकानासमोरील सार्वजनिक जागेवर अनधिकृतपणे शेड, प्रोजेक्शन, वाढीव बांधकाम अथवा अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण करू नये. प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या मालमत्तेच्या मंजूर हद्दीमध्येच व्यवसाय करावा व सार्वजनिक जागेचा वापर नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी मोकळा ठेवावा.
केडीएमसी क्षेत्रातील अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून हटविण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. पुन्हा अनधिकृत अतिक्रमण आढळल्यास प्रचलित कायदे व नियमांनुसार आवश्यक ती दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.