

माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना घराचा अचानक स्लॅब कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (१६ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील घरोशीवाडी येथे एका जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी काही कामगार घराच्या दुरुस्तीच्या कामात व्यस्त होते. यावेळी अचानक घराचा स्लॅब कोसळल्याने त्याखाली काम करीत असलेले कामगार स्लॅबखाली अडकले.
अनपेक्षितपणे घडलेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत दीपक बाजीराव जाधव (वय ३७ वर्षे, रा. ताम्हाणे) आणि सचिन बाळाराम कोळी (वय २५ वर्षे, रा. पाणोसेवाडी आदिवासी वाडी) या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
दरम्यान, जुन्या घरांच्या दुरुस्तीची कामे करताना इमारतीची संरचनात्मक स्थिती, स्लॅबची मजबुती आणि आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे. क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने दोन कुटुंबांचा आधार हिरावला आहे. दीपक जाधव आणि सचिन कोळी हे दोघेही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करणारे कष्टकरी होते.
दिवसभर घाम गाळून, मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी दोन पैसे कमवायचे आणि आपल्या माणसांचे आयुष्य सुखकर व्हावे, हीच त्यांची धडपड होती. मात्र, घराच्या दुरुस्तीच्या कामावर गेलेले हे दोघेही पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. घरातील कर्त्या व्यक्तींचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे.
कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त
या दुर्घटनेच्या निमित्ताने जुन्या इमारतींची दुरुस्ती करताना घ्यावयाची खबरदारी, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेची व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बांधकाम करताना इमारतीची संरचनात्मक स्थिती तपासणे आणि कामगारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या मजुरीवर आपल्या कुटुंबाचा संसार चालविणाऱ्या कामगारांचे आयुष्य इतके स्वस्त असू नये. त्यांच्या श्रमांना योग्य मोबदला मिळण्याबरोबरच त्यांच्या जीविताच्या सुरक्षेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.