

अलिबाग: मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी सुरु होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते. वर्षाला सुमारे वीस लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात.
हा मार्ग खुला होत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे. नऊ महिने अलिबाग मांडवा ते गेट वे ऑफ इंडीया, गेट वे ऑफ इंडीया ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या पंधरा लाखाच्या आसपास आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची ही जलवाहतूक सेवा आहे. अलिबाग, मुरुडसह किनारपट्टीवरील नागरिकांना मुंबई शहर गाठण्यासाठी जलमार्ग अधिक सोयीचा ठरतो. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही सेवा बंद होते.
त्यानंतर या मार्गावरील नागरिकांना एक तर रो रो बोट सेवेने मुंबईत जावे जागते, जे सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक खर्चिक ठरत असते. शिवाय रो-रो फेऱ्याही मर्यादीत आहेत आहे. यामुळे लॉन्च सेवा बंद झाल्यानंतर नागरिकांनी रस्ते मार्गेच प्रवास करावा लागतो.
पर्यटकांचा सर्वांत आवडता मार्ग
मुंबईतील पर्यटकांचा हा सर्वात आवडता मार्ग आहे. ऐतिहासिक गेटवे परिसराचा झगमगाट, प्रदुषण विरहीत जलप्रवास, प्रवासा दरम्यान सीगल पक्षांची संगत आणि जलवाहतुकीचा अनुभव लुटण्यासाठी मुंबईतील बहुतांशः पर्यटक स्वस्तात मस्त असलेल्या या मार्गाची निवड करतात. १ सप्टेंबरपासून हा मार्ग खुला होत असल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला भरारी येईल, अशी आशा येथील पर्यटक व्यावसायिकांना आहे.
आजपासून लॉन्चसेवा सुरु
जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने अलिबाग तालुक्यातील मांडवा ते मुंबईतील गेट वेदरम्यानची जलवाहतूक बंद असते. त्यामुळे तीन महिने येथे शांतता असते. या लॉन्चसेवेचा वापर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात होत असतो. तीन महिने लॉन्चसेवा बंद राहिल्याने रायगड जिल्हयातील पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. अलिबाग आणि मुरुडमध्ये पर्यटन स्थळे ओस पडलेली दिसतात.
पर्यटकांची संख्या कमी झाल्याने त्याच्या येथील पर्यटन व्यवसायांवरही मोठा परिणाम होतो. दररोज हजारो पर्यटक या मार्गावरून प्रवास करीत असतात मात्र तीन महिने बोट सेवा बंद राहिल्याने एकप्रकारे पर्यटनातील आर्थिक चक्रच मंदावते. आता ही तीन महिन्याच्या बंदीचा काळ समाप्त होत आहे. १ सप्टेंबरपासून पुन्हा लॉन्चसेवा सुरु होत आहे.