

मुंबई: मुंबईत ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबईमध्ये सर्वात कमी पाऊस झाला होता. यंदाही ऑगस्टमधील पावसाची टक्केवारी कमी असून महिन्याभरात संपूर्ण शहरात अवघा १३ टक्के पाऊस झाला आहे. यात शहर विभागात १५८ मिमी तर उपनगरात ३१० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहर व उपनगरात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात शहरातील एकूण सरासरी पावसाच्या साधारणतः ६० टक्के पेक्षा जास्त पाऊस होतो. २००७ मध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात ४७ टक्के पाऊस पडला होता. तर २००४ मध्ये या दोन महिन्यात ७८ टक्के पाऊस झाला होता.
यात ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी २५ ते ३० टक्के पाऊस होतो. ऑगस्ट महिन्यात शहर विभागात ४८२ मिमी व उपनगरात ५६६ मिमि पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये शहरात १५८ मिमी तर उपनगरात ३१० मिमी पाऊस झाला आहे. शहरातील अपेक्षित पावसाच्या ३३ टक्के पाऊस तर उपनगरात ५५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्टमध्ये पडलेल्या मागील १० वर्षाच्या पावसाच्या तुलनेचा विचार केल्यास २०२३ मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे शहर विभागात ११० मिमी तर उपनगरात १७४ मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद २०२० मध्ये झाली होती. यावेळी शहरात ११३५ मिमी तर, उपनगरात १२४९ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती.
जुलैमध्ये समाधानकारक
जून अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली. जून अखेरपर्यंत शहरात २४ टक्के तर उपनगरात २२ टक्के पाऊस झाला होता.
जुलैमध्ये शहरात ५२ टक्के तर उपनगरात ६० टक्के पाऊस झाला. हा पाऊस मागील दहा वर्षाच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.