

उरण : गेल्या वर्षभरापासून उरणबाहेर असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणाऱ्या उरणमधील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. जेएनपीटी कामगार वसाहतीत स्थलांतरित करण्यात आलेले मुख्य पोस्ट ऑफिस आता पुन्हा एकदा उरण शहरात सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला आणि आंदोलनाला अखेर यश आले असून, शहरात पोस्ट ऑफिस परतल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वर्षभरापूर्वी उरण शहरातील आनंदनगर येथील पोस्ट ऑफिसची इमारत धोकादायक ठरवून तेथील कामकाज शहरापासून तब्बल 6 किलोमीटर दूर असलेल्या जेएनपीटी वसाहतीत हलवण्यात आले होते. या दूरच्या अंतरामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बचतधारक आणि महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
साध्या कामासाठी किंवा पेन्शन घेण्यासाठी जाताना नागरिकांचे 50 ते 100 रुपये अतिरिक्त खर्च होत होते आणि वेळही वाया जात होता. पोस्ट ऑफिस पुन्हा शहरात आल्यामुळे आता या आर्थिक भुर्दंडापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
उरण शहरातील कामगार रस्त्यावरील युनियन बँकेशेजारी असलेल्या पहिल्या मजल्यावरील 1,000 चौरस फूट जागेत हे पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्यात आले आहे. मंगळवारपासून (19 मे) येथे अंशतः कामकाज सुरू झाले असून, काही तांत्रिक अडचणी दूर करून पुढील आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने काम सुरू होईल, अशी माहिती पोस्ट मास्टर एन. एन. सुरवसे यांनी दिली आहे.तलाठी कार्यालय, दुय्यम निबंधक आणि वन कार्यालयानंतर आता पोस्ट कार्यालयही शहरात परतल्यामुळे उरणकरांची एक मोठी प्रशासकीय अडचण दूर झाली आहे.
‘शहराबाहेर पोस्ट ऑफिस गेल्यामुळे आमची खूप गैरसोय होत होती. आता ते पुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेतली, याचे समाधान आहे.
रामचंद्र म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक, उरण