

हनिफ शेख
पालघर: सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गंभीर परिस्थिती होताना दिसत आहे. मुळात पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या भागात उन्हाचा पारा दरवर्षी म्हणावं इतका चढा नसतो. मात्र यंदा मिनी महाबळेश्वर असे संबोधले जाणारे जव्हार देखील तापल्याने यंदाचा उन्हाळा किती भयंकर आहे याची प्रचिती येत आहे.
आजवर भर उन्हाळ्याच्या मे महिन्यात जास्तीत जास्त 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणारा तापमानाचा आकडा यंदा एप्रिलमध्येच 42 वर पोहोचल्याने लोकांना उन्हाचा तडाखा बसला आहे. त्यात शुक्रवारी महावितरण करून लोड शेडिंग घेण्यात आल्याने तर या भागातील नागरिक पुरते हैराण झाले होते. यामुळे एकीकडे उन्हाच्या लाटा तर दुसरीकडे महावितरणाचा शॉक यामध्ये जव्हार मोखाडा तालुक्यातील जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यापासून 90 ते 100 किलोमीटर लांब असलेल्या भागात जर ही परिस्थिती आहे तर पालघर समुद्रकिनारी वसलेल्या तालुक्यांमध्ये तर वातावरण अधिक उष्ण असून दमट देखील आहे. यामुळे दिवसेंदिवस वाढलेले तापमान शरीरासाठी अधिक धोकादायक होत असल्याचे चित्र आहे यामुळे आजवर मिनी महाबळेश्वर म्हणून मिरवणारे जव्हार देखील यंदा चांगले तापले आहे.
यामुळे पालघर जिल्हा 42 पार करत असून जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. किनारपट्टी भाग असूनही घामाच्या धारांनी नागरिक हैराण आहेत. 42 अंश सेल्सिअस वर तापमान पोहोचल्याने मजुरांची देखील मोठ्या प्रमाणावर हलवत असून वाढलेल्या उन्हामुळे सकाळी अकरा वाजण्याच्या आत आणि संध्याकाळी चार वाजेनंतर मेहनतीची कामे करण्यास मजुरांनी प्राधान्य दिल्याचे देखील दिसून येत आहे.
तर दुसरीकडे विजेची प्रचंड मागणी वाढल्याने अनेकदा जव्हार मोखाड्यातील ग्रामीण भागात होल्टेज देखील कमी असल्याने साधे पंखे फिरण्याचाही अडचणी निर्माण झाले आहेत. या वातावरणामुळे शेतीच्या किंवा रोजगार हमीवर काम करणारे तसेच मासेमारी आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना याचा सर्वाधिक त्रास होण्याची चिन्हे आहेत. यामुळे अनेकदा दुपारी 12 ते 4 बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. पालघरच्या चिकू, भातशेतीवर उष्णतेचा परिणाम दिसतोय. बोईसर, डहाणू जव्हार मोखाडा भागात विहिरींची पातळी खाली गेलीय. पाणीटंचाईची झळ ग्रामीण भागाला बसतेय.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ज्या ठिकाणी आजही जंगलाचे प्रमाण मोठे आहे अशा ठिकाणी देखील जर आज घडीला उष्णता एवढी वाढली असेल तर भविष्यात याबाबतची खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. खरंतर तापमान वाढण्याची मुख्य कारणे पाहिल्यास ग्लोबल वॉर्निंग म्हणता येईल.
पालघरमध्ये देखील विकासाच्या नावाखाली अनेकदा झाडे कमी झालेली आहेत. शहरी भागात काँक्रीटची जंगले वाढली आहेत. सिमेंट डांबर उन शोषून गरम होतं आणि रात्री पण उष्णता सोडत अशा विविध मानवनिर्मित गोष्टींमुळे देखील हे तापमान वाढलेले दिसून येते. यामुळे एप्रिलमध्येच अशी परिस्थिती असेल तर मे महिन्यात ही उष्णता वाढण्याची दाट शक्यता आहे.यामुळे रुग्ण वयस्कर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे
ग्रामीण भागातील नागरिकांची बाटलीबंद पाण्याला पसंती ?
पालघर जिल्ह्यातील अनेक तालुके भौगोलिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आहेत अशावेळी तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालय मुख्य बाजारपेठ असते याशिवाय सगळी सरकारी कार्यालय देखील मुख्यालय असतात.
यामुळे मुख्यालय गाठण्यासाठी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा जर अभ्यास केला तर तालुका मुख्यालय ते गाव यांचे अंतर 25 ते 30 किलोमीटर देखील असल्याचे दिसून येते अशावेळी अनेक नागरिक भर उन्हात आपल्या कामासाठी किंवा बाजारातील खरेदीसाठी येत असतात अशा वेळी कुठेही सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने या नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला पसंती मिळत आहे.