Uran Power Cut : पहिल्याच पावसात महावितरणची 'पोलखोल'!

उरण पूर्व भागात वीजपुरवठा बंद; नागरिकांवर रात्र जागून काढण्याची आली वेळ
Uran Power Cut
Uran Power Cutpudhari photo
Published on
Updated on

उरण : पावसाळ्यापूर्वी सर्व पूर्वतयारीची कामे पूर्ण केल्याचा छातीठोक दावा करणाऱ्या महावितरण कंपनीची पहिल्याच पावसात पुरती नाचक्की झाली आहे. उरण तालुक्यात मंगळवार २३ जून रोजी पावसाचे आगमन झाले. मात्र, पाऊस सुरू होताच उरण पूर्व भागातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. दिवसभरात तब्बल २० ते २५ वेळा वीज खंडित झाल्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची 'पोलखोल' झाली असून, नागरिकांना पहिलीच रात्र अंधारात आणि डासांच्या विळख्यात जागून काढावी लागली.

उरण-पनवेल परिसरातील महावितरणच्या वाढत्या वीज समस्यांबाबत दोन दिवसांपूर्वीच उरणचे आमदार महेश बालदी यांनी भांडुप विभागाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्यासोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उरण, पनवेल आणि खालापूर परिसरातील वीज पुरवठा पावसाळ्यात सुरळीत ठेवण्याचे कडक निर्देश देण्यात आले होते. मात्र, आमदार आणि मुख्य अभियंता यांच्या या उच्चस्तरीय निर्देशांना पहिल्याच पावसाने केराची टोपली दाखवल्याचे चित्र समोर आले आहे.

Uran Power Cut
Beed power outage : पाऊस आला की बत्ती गुल; उकाड्याने नागरिक हैराण

सध्या महावितरणकडून ग्राहकांना 'स्मार्ट मीटर' बसविण्याची सक्ती केली जात आहे. यावरून उरणमधील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "एकीकडे पहिल्याच पावसात २० ते २५ वेळा वीज गुल होते, रात्र-रात्र अंधारात काढावी लागते; अशी आमची मोडकळीस आलेली वीज वितरण यंत्रणा आहे. महावितरणने आधी आपली ही खिळखिळी झालेली वीज वितरण व्यवस्था सुधारावी आणि मगच स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करावी," अशी संतप्त मागणी आता ग्राहकांकडून केली जात आहे.

मंगळवारी झालेल्या पावसाने उरण पूर्व भागातील जनजीवन विस्कळीत केलेच, शिवाय वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल बेहाल झाले. असह्य उकाडा आणि त्यात डासांचा प्रादुर्भाव यामुळे बालके, महिला आणि वृद्ध नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मध्यरात्री उशिरा दोनच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला, तोपर्यंत नागरिकांना पहिलीच रात्र जागून काढावी लागली होती.

Uran Power Cut
Raigad News: अवकाळी पावसाने महावितरणची यंत्रणा उद्ध्वस्त

"सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी झंपर तुटले होते, तर काही ठिकाणी पोलवरच्या चिनी मातीच्या प्लेट्स (इन्सुलेटर्स) फुटल्या होत्या. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. आता आम्ही तातडीने ती सर्व कामे दुरुस्त केली असून, पुन्हा वीज खंडित होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल."

विकास गायकवाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, उरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news