

अलिबाग : अतुल गुळवणी
रायगडात येत्या 2 डिसेंबरला 10 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.या निवडणुका जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहेत.जिल्ह्यातील शहरांमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे यावरुन दिसणार आहे. या निवडणुकानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने नगरपालिकांवर विजय मिळविण्यासाठी राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
रायगडातील अलिबाग, पेण, उरण, माथेरान, कर्जत, खोपोली, रोहा, मुरुड, महाड, श्रीवर्धन या नगरपालिका क्षेत्रात या निवडणुका होणार आहेत.याची अधिसुचना दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेली आहे.10 नोव्हेेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.यामुळे या निवडणुकांची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे.तब्बत तीन वर्षानंतर या निवडणुका होणार आहेत.सध्या सर्वच नगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे.यामुळे मागील पाच वर्षात आपण काय केले याचा गृहपाठ नगरपालिकांमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांना करुन 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाला सामोरे जावे लागणार आहे.
मागील निवडणुकांमध्ये महाडमध्ये एकत्रित शिवसेना, रोहा, श्रीवर्धनमध्ये एकत्रित राष्ट्रवादी, पेणमध्ये काँग्रेस, खोपोलीत एकत्रित शिवसेना, उरणमध्ये एकत्रित शिवसेना, अलिबागमध्ये एकत्रित शेकाप, माथेरान, कर्जतमध्ये शिवसेना, मुरुडमध्ये शिवसेना असे सत्ताधारी होते.पण गेल्या पाच वर्षात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये फाटाफूट पडली आहे.त् याचे पडसाद रायगडातही उमटले आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,शेकाप या प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली आहे. यामुळे आता होण़ाऱ्या निवडणुकीत हे सर्व राजकीय पक्ष परस्परांच्या विरोधातउभे ठाकणार आहेत. त्यातून कोण विजयी होणार,कुणाची सत्ता येणार,कशी आघाडी,युती होणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. शहरातील मतदार हे जागरुक असतात.त्यामुळे ते कुणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महायुतीतच सत्तेसाठी संघर्ष
रायगडात सद्यस्थितीत महायुती प्रबळ असली तरी पक्षातील घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये कमालीचे वितुष्ट आलेले आहे.जिल्ह्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी या मित्रपक्षातच चुरस निर्माणझालेली आहे.यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकात याचे पडसाद जोरदार उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष करुन खोपोली, महाड, रोहा, श्रीवर्धन, माथेरान या नगरपालिकांमध्ये शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महायुती एकत्रित न लढता वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढू शकते,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अलिबागमध्ये मागील निवडणुकीत शेकाप सत्तेवर होता.यावेळी त्यांना पक्षांतर्गत फुटीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय शेकापच्या विरोधात नेहमीप्रमाणे सर्व विरोधक एकत्र येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.असाच प्रयोग रोह्यातही घडण्याचा अंदाज आहे.खा. सुनील तटकरे यांच्या विरोधातही असेच सर्वच विरोधक केवळ रोह्यापुरते एकत्र येऊ शकतात.हे प्रयोग यापूर्वीही अनेकदा घडलेले आहेत.त्याचीच पुनरावृत्ती यावेळी घडले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
इच्छुकांची उमेदवारीसाठी भाऊगर्दी
पुढील पाच वर्ष नगराध्यक्षपद हे थेट नागरिकांमधून निवडूण दिले जाणार आहे.यामुळे या पदावर डोळा ठेवत सर्वच राजकीय पक्ष आपली रणनिती आखू शकतात.या नगराध्यक्षपदावरही इच्छुकांनी दावा केलेला आहे.यामुळे निवडूण येण्याची क्षमता असणारा,खर्च करु शकणारा उमेदवारच सर्वच पक्षांकडून दिला जाणार आहे.याशिवास प्रभागातून उमेदवार देतानाही योग्य तो निवडणूक जिंकणारा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांना शोधावा लागणार आहे.