

पनवेलः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत. सर्वात अगोदर नगरपरिषदा आणि नगरपालिकेसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची आणि संपूर्ण रायगडचे निवडणूक प्रभारी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. निवडणूक व्यवस्थापनामध्ये त्यांचा हातखंडा असल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आ.ठाकूर यांच्यावर हि जबाबदारी सोपवली आहे.
कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. परंतु जानेवारी महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड मध्ये नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे.
त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिकेची रणधुमाळी होणार आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात राजकीय स्थित्यंतरे झाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा आघाडीवर आहे. या पक्षाची सर्वच तालुक्यांमध्ये ताकद वाढलेले आहे.
रवींद्र चव्हाण यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद होते. त्यामुळे या जिल्ह्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळावे या उद्देशाने त्यांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे 2004 पासून निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे.
मायक्रो प्लॅनिंग मध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले. त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांची कामगिरी उजवी ठरली. त्यांच्या कार्यकाळात भाजप रायगडमध्ये विस्तारला गेला. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून प्रदेशाध्यक्षांनी निवड केली आहे.
विजय आणि ठाकूर हे समीकरण
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यावर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. विजय आणि ठाकूर हे समीकरण कायम राहिले आहे. त्यांनी खासदार म्हणून संसदेत नेतृत्व केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला व्हावा यासाठी उत्तर रायगड निवडणूक प्रमुख म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रायगड दक्षिण साठी ज्येष्ठ नेते सतीश धारप निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या नावाची पक्षाने घोषणा केली.