

पेण : आधीच राज्यासह रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची होत चाललेली वाताहत लक्षात घेता या शाळा टिकल्या पाहिजेत या उद्देशाने पाऊल उचलण्याचे राज्य शासनाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र , याउलट नुकतेच फडणवीस सरकारने एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शाळांचे भवितव्य तर धोक्यात येणारच आहे.
मात्र ज्या शाळेत एक ते पाच संख्या आहे त्या शाळा बंद झाल्या तर त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे हे लक्षात घेऊन पेण तालुक्यातील सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि पालक पेण प्रांत कार्यालयासमोर मोर्चा काढून शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात येणार असल्याच सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
काही महाविद्यालयांना प्राध्यापक नाहीत, आश्रम शाळांना शिक्षक नाहीत, पडझड झालेल्या शाळा,शौचालयांची दुरावस्था, नसलेले स्वच्छतागृह, अपुरे शिक्षक, आणि ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता अशा प्रकारची अवस्था फक्त पेणमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांची अशी अवस्था असताना फडणवीस सरकार या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी एक ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करत आहे ही खेडजनक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी गोष्ट असल्याचे लक्षात घेऊन आम्ही पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी आणि पालक यांना सोबत घेऊन प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून शिक्षण हक्क सत्याग्रह करणार असल्याचे संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
50 टक्के शिक्षक पदे रिक्त
संदीप पाटील यांनी पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची सत्यता पत्रकारांसमोर मांडली. पेण तालुक्यात 50 शिक्षकांची पदे रिक्त असून सहा जिल्हा परिषदेच्या शाळांना शासनाने शिक्षकच दिलेले नाहीत. तसेच रोडे जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवी असून ती पटसंख्या 106 विद्यार्थ्यांची आहे. पण या शाळेला तीनच शिक्षक दिलेले असल्याने हे तीनच शिक्षक या शेकडो विद्यार्थ्यांना शिकविणार तरी कसे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
पेण तालुक्यात काही शाळा शून्य शिक्षकी आहेत परंतु त्या सर्व शाळांवर शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. एक ते पाच पाटाच्या सर्व शाळा आपल्याकडे सुरू आहेत. त्याबाबतचा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाला तरच निर्णय घेऊ. कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे.
शर्मिला शेंडे, गट शिक्षणाधिकारी पेण