

महाड : मागील आठवड्यात झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
महाड नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीदरम्यान झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणांकडून कार्यवाही एकीकडे सुरू असतानाच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस प्रस्थानिक यंत्रणेला पार पाडावे लागणार आहे.
या कामी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भारतीय लोकशाहीची असलेली परंपरा व त्या संदर्भातील असणारी नागरिकांची कर्तव्य पुरती याची जाणीव ठेवत सर्व पक्षाच्या मार्फत होणाऱ्या निवडणुका कायदा व सुव्यवस्थेमध्ये संपन्न होतील याकरिता अधिक जबाबदारीने कार्यरत होणे आवश्यक राहणार आहे.
निवडणूक आयोगाला कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात अधिक अधिकार स्थानिक प्रशासनामार्फत प्राप्त झाल्यास या ठिकाणी निवडणूक आयोगामार्फत विशेष दक्षता पथकांची नियुक्ती करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे . राजकीय वादावादी मध्ये त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक व निवडणूक मतदारांना बसणार नाही याकरिता स्थानिक यंत्रणांनी अधिक दक्ष राहणे देखील आवश्यक झाले आहे.
प्रशासन व पोलीस प्रशासनामार्फत या संदर्भात विभागाचे असलेले सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत दक्ष राहावे लागेल हे मागील काही दिवसांतील झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट झाले आहे. एकूणच महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादावादीच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तालुक्याच्या विविध भागात स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणेसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
वादाचे दीर्घकालीन पडसाद
निवडणुका व निवडणुकीचा राजकीय ज्वर हा काही दिवसांपुरताच असतो हे मान्य करून त्याचा दीर्घकालीन परिणाम समाज व्यवस्थेवर व वैयक्तिक हितसंबंधावर होऊ नये याकरिता सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वांकडून विशेष काळजी घेणे मागील काही वर्षातील अनुभवांती गरजेचे झाले असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.