

खाडीपट्टा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे ते राजेवाडी फाटा या नव्याने मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन पदरी महामार्गाचे काम अधिक गतीने सुरू झाले असून या वर्षभरात हे काम पूर्णत्वाला जाईल अशी आशा खाडीपट्टावासीयांना वाटत असून या महामार्गावरील मुठवली गावालगत असलेल्या वळणावर अरुंद साकवची रुंदी वाढविण्याची आवश्यकता आहे. वळण आणि अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वाटत असून त्यामुळे त्याठिकाणी रुंदीच्या साकवची आवश्यकता वाटत आहे.
सन 2017 मध्ये सावित्रीपुल उद्घाटन प्रसंगी सदर राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. 2019 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्णत्वाला जाणे गरजेचे असताना, मात्र सद्यस्थितीला हे काम प्रगतीपथावर असून खाडीपट्ट्यातून जाणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनमुळे दोन पदरी काँक्रिटीकरण असणाऱ्या रस्त्याला ओवळे ते राजेवाडीफाटा पर्यंत डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.
या दरम्यान शिरगाव फाट्यापासून दीड किमी अंतरावर असणाऱ्या मुठवली गावालगत नदीवरील छोट्याशा अरुंद सकाव असून तेथे देखील सद्यस्थितीला डांबरीकरण रस्ता करण्यात आला आहे, मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम अजून अपूर्ण असून या कामामध्ये मुठवली येथील नदीवरील साकव चांगल्या स्थितीत बांधण्याची आवश्यकता असून महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी वळण आणि अरुंद रस्ता यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
दोन पदरी महामार्गावरून वेगवान धावणाऱ्या वाहनांना अरुंद आणि वळणाचा रस्ता अपघाताचे कारण ठरू शकते त्यामुळे याकडे गांभीर्याने संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रावढळ पुलाच्या कामा बरोबरच मुठवली येथील वळणावर असलेल्या या अरुंद साकवाची रुंदी वाढवून नव्या मोठा साकवाची उभारणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील दोन पदरी रस्त्याची 10 मीटर काँक्रिटीकरण, तर 7 मीटर डांबरीकरण रस्त्याची रुंदी ठेवण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्ष या महामार्गावर गेलो असता मुठवली येथील साकवाच्या दरम्यान वळणावर डांबरीकरण रस्त्याची रुंदी 7 मीटर आढळून येत नाही, त्याचबरोबर हे वळण असल्यामुळे 7 मीटर पेक्षा अधिक रुंदी ठेवण्याची आवश्यकता आहे.
रस्त्याच्या कामांना आला वेग
पावसाळा संपला असून आणि राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये बेबलघर येथील काँक्रिटीकरण रस्त्याचे एक बाजूने काम पूर्ण करण्यात आले असून खाडीपट्टयातील महामार्गाचे काम हळूहळू टप्प्याने पूर्ण होईल त्याचबरोबर रावढळ पुलाचे काम देखील महिनाभरात सुरू होईल अशी माहिती संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. या कामांबरोबर मुठवली येथील वळण आणि साकवाचे काम यासंदर्भात सुद्धा प्राप्त केलेल्या माहिती वरून ते देखील काम या टप्प्यामध्ये करण्यात येईल अशी देखील संबधित आधिकारी वर्गाने माहिती दिली आहे.
मुठवली वळणावर साकवाची रुंदी वाढविण्याच्या आवश्यकता असून त्याचे काम देखील काही दिवसांत करण्यात येईल.
अभिजीत झेंडे, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उप-विभाग, महाड