मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगर पुनर्विकास प्रकल्पातील साडेचार हजार झोपडीधारकांना पुढील दोन वर्षांत पहिल्या टप्प्यात नवीन घरे दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणात घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर येथील काही झोपड्या बाधित होत आहेत. या झोपड्यांसोबतच पूर्ण झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांच्यामार्फत संयुक्तरित्या राबवला जात आहे. साधारण 16 हजार 675 झोपड्यांचे पुनर्वसन यात केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 4 हजार 53 झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी 22 मजली अशा 6 इमारतींचे बांधकाम केले जाईल. यात पात्र झोपडीधारकांना एक बेडरूम, हॉल व किचन स्वरूपाची 300 चौरस फूट चटई क्षेत्र असलेली घरे विनामूल्य देण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या निविदेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर अखेर 4 विकासकांनी या प्रकल्पात स्वारस्य दाखवले होते.
बी. जी. शिर्के, मॉन्टेकार्लो, जे. कुमार, एनसीसी यांनी निविदा सादर केल्या होत्या. यापैकी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीने 1 हजार 99 कोटी रुपयांची लघुत्तम निविदा सादर केली होती. त्यामुळे याच कंपनीला पहिल्या टप्प्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सर्व पात्र झोपडीधारकांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे 137.50 कोटी इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. आता भूमिपूजन झाले असून लगेच बांधकामास सुरुवात होणार आहे.
पुनर्वसन योजनेची वैशिष्ट्ये
31.82 हेक्टर वसाहतीमध्ये पक्के रस्ते, रस्त्यावरील दिवे, पर्जन्यजल निचरा व्यवस्था, खेळाची मैदाने, प्राथमिक शाळा, धार्मिक आणि सामाजिक स्थळे विकसित करण्यात येणार आहेत.
इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील 10 वर्षे त्या इमारतीची देखभाल कंत्राटदाराकडून करण्यात येईल.
हा प्रकल्प केवळ गृहनिर्माणापुरता मर्यादित नसून एक वाणिज्यिक केंद्र म्हणून उभा
राहणार आहे. या वाणिज्यिक केंद्रामुळे स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
पूर्व द्रुतगती महामार्गास लागून असलेला हा परिसर विमानतळ, उपनगरी रेल्वे स्थानक व प्रमुख रस्तेमार्गांशी उत्तमरित्या जोडलेला आहे. हा प्रकल्प घाटकोपर रेल्वे स्थानकापासून 2.5 किमी, मुंबई विमानतळापासून 4.8 किमी, वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून 12 किमी आणि शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूपासून 9.5 किमी अंतरावर आहे. तसेच पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचा विस्तारित भाग या परिसरातून जात आहे. ज्यामुळे वाहतुकीची जोडणी अधिक सक्षम होणार आहे.