

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड तालुक्यातील खाडीपट्टयाच्या परिसरातील ग्रामीण कुंभळे विभागात विजेच्या लपंडावाने नागरिक पुरते त्रस्त झाले असून वाढलेल्या तापमानाने आणखी त्रासदायक ठरत आहे. महावितरण कंपनीकडून अत्यंत अनियमितपणे वीज गायब होत आहे. त्याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत आहे.
महावितरण कंपनीचे एका महिन्याचे जरी वीज बील भरले नसले, तरी कारवाई होते. मात्र दरदिवशी वारंवार गायब होणाऱ्या वीजेमूळे होणाऱ्या नागरिकांच्या त्रासाचे काय ? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेळेवर वीज बिल न भरल्यास कर्मचारी लगेचच वीज कापण्यास धावतात, मग न सांगता, वेळीअवेळी वीज गायब होते तेव्हा हेच कर्मचारी, अधिकारी तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी का येत नाहीत.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला देखील वीजेच्या लपंडावाचा मोठा फटका वारंवार बसत असून कित्येक वेळेस वीज गायब झाल्याने खैरे धरणावरील मोटार जळण्याची समस्या उद्भवते त्यामुळे कित्येक वेळेस ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत खैरे धरणाचे पाणी देखील उपलब्ध होत नाही.
यासंदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्यातरी अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे. वारंवार होणाऱ्या वीज गायबच्या तक्रारीकडे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सत्वर वीज पुरवठा सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नाहीतर मोर्चा काढण्याची वेळ जवळ आल्याची नागरिकांनी बोलून दाखविली.
निवडणूका आल्या की, विकासाच्या आश्वासनांची खैरात केली जाते, मात्र प्रत्यक्षात निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशा प्रसंगांमध्ये सामान्य कार्यकर्त्याचा फोन देखील उचलत नसल्याची बाब एका सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बोलून दाखविली. खाडीपट्टयातील एका गावामध्ये रात्रभर वीज गायब होती.
अशा वेळा या कार्यकर्त्यांनी दहा वेळा फोन केले मात्र लोकप्रतिनिधींनी एकही कॉल उचलला नसल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार वीजेच्या लपंडावाने गावी आलो की, वीज गायब, पाण्याची टंचाई, रस्त्याची दयनीय अवस्था असे परगावातून आलेल्या लोकांकडून सर्रास येथील नागरिकांना ऐकावे लागत आहे.
दरम्यान, वारंवार वृक्ष छाटणीच्या आणि एचटी लाइन मेंटेनेंसच्या कामासाठी किंवा अनेकवेळा इतर अचानक वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. महावितरण कुंभळे विभागातील जुई, सोनघर, वालंग, खैरे, आदिस्ते, ओवळे, तेलंगे, बेबलघर, चिंभावे, वराठी, गोमेंडी या सर्व गावांचा समावेश आहे.
कमी-अधिक वीज दाबामुळे उपकरणांचे नुकसान
मागील दोन वर्षांपूर्वी अनेकवेळा काही भागात विद्युत वाहिन्यांच्या कमी अधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले होते. मात्र महावितरण कंपनीला या सगळय़ाशी आणि नागरिकांच्या त्रासाशी काहीच देणेघेणे नसल्यासारखाच त्यांचा कारभार सुरू आहे, अशी देखील प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
येथील नागरिकांनी वाढत्या तापमानाचा बचाव करण्यासाठी कुलर, एसी सारख्या वस्तूंची खरेदी केली आहे, मात्र वरंवार गायब होणाऱ्या वीजेमूळे त्या वस्तूंचा लाभ घेता येत नाही असेही नागरिकांनी सांगितले. तर फ्रिज, वाशिंग मशिन, टिव्ही आदी इलेक्टिक वस्तूंचा देखील गायब होणाऱ्या वीजेमूळे वापर होत नाही. वीज बील वेळेत भरुन देखील वीज पुरवठा सुरळीत का रहात नाही ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.