Dhule News : धुळ्यात विजेचा खेळखंडोबा; रामवाडी सबस्टेशनवर दगडफेक

वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष
MahaVitaran Employee
महावितरण Pudhari
Published on
Updated on

धुळे : वीज पुरवठ्याच्या खेळ खंडोबा झाल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने जाब विचारण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रामवाडी सब स्टेशनवर धाव घेतली. मात्र, कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे जमाव आणि कर्मचाऱ्यांमध्ये विसंवाद झाला. परिणामी या सबस्टेशनवर अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप केला जातो आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील जनतेसमवेत समन्वयाची भूमिका ठेवावी व वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक अमूल मासोळे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.

धुळे शहरातील रामवाडी सबस्टेशनवरून वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना गेल्या दोन महिन्यांपासून घडत आहेत. विशेषतः दुपारी तापमानाचा पारा वाढलेला असताना वीजपुरवठा खंडित होतो. तर रात्री अनेक वेळेस वीज गायब होते. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक विजेच्या खेळ खंडोबाला पुरते वैतागले होते. त्यातच काल रात्री अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी काही नागरिकांनी रामवाडी सबस्टेशनच्या दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे जमावाने थेट रामवाडी सबस्टेशन गाठले. यावेळी कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण विचारण्यात आले. मात्र, यावेळी संवाद न होता विसंवाद वाढत गेला. त्यामुळे जमावातील काही अज्ञात तरुणांनी सबस्टेशनवर दगडफेक केली. तर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. दरम्यान विजेच्या केबल मध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू होते त्यामुळे वीज पुरवठा खंडित होता, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.

नगरसेवक मासुळे यांचा आंदोलनाचा इशारा

धुळ्यातील मिल परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने नगरसेवक अमोल मासुळे यांनी थेट जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या तापमान ४३ ते ४४ अंशांच्या पार गेले आहे. अशा स्थितीत मिल परिसरात अनेक तास वीज गायब राहते. एकदा खंडीत झालेला वीज पुरवठा ८ ते १० तास सुरळीत होत नसल्याची नागरिकांनी तक्रार आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी फोन केल्यास महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नाहीत. किंवा रिसीव्हर बाजूला ठेवून देतात. चुकून फोन रिसीव्ह केलाच तर कार्यालयातील कर्मचारी सौजन्याने बोलण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनियमित वीज पुरवठा आणि वारंवार कमी दाबाने होणारा विज पुरवठ्यामुळे विज उपकरणांचे नुकसान होते आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा आरोप नगरसेवक मासुळे यांनी केला आहे. मिल परिसरातील वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा, परिसरातील सर्व संतप्त नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा अमोल मासुळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news