

महाड: महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रातील प्रसोल कंपनीमध्ये गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा आगीची घटना घडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रसोल कंपनीच्या प्लांटमधील सल्फर असलेल्या ड्रमला सोमवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आग्निशामन दलाला पाचारण करण्यात आल्याने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. गेल्या काही वर्षांपासून प्रसोल कंपनीत वारंवार आगीच्या घटना घडत असल्यामुळे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, परिसरातील नागरिक आणि कामगारांनी प्रशासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून कामगारांचे आणि स्थानिक नागरिकांचे जीवन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, असे आवाहन कामगार वर्गाकडून करण्यात आले आहे.