

कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर,वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर,गणेशपुरी, आणि उलवे ही गावे विस्थापित झाली. पण त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-1, आर-2, आर-3, आर-4, आर-5 अशी नवीन नावे दिली आणि गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकली. या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी यासाठी दहा गाव समिती आणि भाजपचे समीर केणी यांनी पाठपुरावा केला होता. त्याला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ देऊन सिडकोने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे.
सिडकोने पनवेल परिसरात होणा-या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवे सारख्या भागातील जमिनी संपादित केल्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून 22. 5 टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले.
याबाबत समीर केणी यांनी आ.महेश बालदी यांच्याकडे चर्चा केली असता बालदी यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरु केला होता. 2017 सालापासून समीर केणी हे सिडको अधिकार्यांना विचारणा करत होते. पण सिडकोचे अधिकारी टोलवाटोलवीचे काम करत असल्याचा आरोप केणी यांनी केला होता.
सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या अहवालानुसार बैठक घेण्यात आली होती. या निवेदनामध्ये त्यांनी आर. 1 आर.2. आर.3. आर 4, आर 5 क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावासंबंधीत कागदपत्रावर नामांकनावर फलक उभारून देणेबाबत विनंती केलेली होती. वरील नियोजनकार व मुख्य अभियंता नवी मुंबई यांना आर.1. आर.2. आर.3. आर 4. आर 5 क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे कागदपत्रावर नामांकरण व फलक उभारून देणेबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना समीर केणी यांनी केली.
घर बदलली,पत्ते मात्र जुनेच
नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित आली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडावर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड सिडकोचे असल्याने त्यांना नावेही सिडकोने दिली. काही ठिकाणी चिंचपाडावासीय ग्रामस्थ एका ठिकाणी, काही ठिकाणी कोल्ही कोपर मधील तर काही ठिकाणी वरचे ओवळे ग्रामस्थ एक भागात वसले, त्यांना सिडकोने आर 2. आर 3, करंजाडे नोड अशी नावे दिली. पण त्यामुळे या गावांची जुनी ओळख पुसली गेली.
ग्रामस्थांनी आपल्या रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक यावरील पत्ता हा जुन्या गावातीलच आहे. कोणी पत्ता विचारला तर तो पत्ता देखील ग्रामस्थांना आता नीट सांगता येत नाही, यासाठी शासन दरबारी या नव्याने वसलेल्या वसाहतींना देखील जुन्या गावांची भाडे लावण्यात यावीत अशी मागणी नागरिक करीत होते.
विमानतळ बाधित गावांना ओळख मिळून देण्यासाठी दहा गाव समिती आणि आम्ही पाठपुरावा केला होता. त्याला पनवेल आणि उरणच्या आमदारांनी पाठबळ दिले. त्यामुळे आता आम्हाला आमची जुनी ओळख मिळणार आहे. यामुळे आमच्या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत आहे.
समीर केणी , वडघर अध्यक्ष ,भाजप