

उरण (रायगड) : सात वर्षाच्या मुलीने आपल्या बापाने रचलेला बनाव उघडकीस आणला आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून बापाने आपल्या पत्नीला रॉकेल टाकून जाळून मारले होते. त्यानंतर, पत्नीने जीवनयात्रा संपवल्याचा बनाव केला. मात्र, मुलीच्या साक्षीनं सत्य समोर आलं आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.
राजकुमार रामशिरोमणी शाहू (३५) हा मूळचा मध्य प्रदेशचा असून, तो पत्नी जगरानी शाहू (३५) आणि सात वर्षांच्या मुलीसोबत उरणमधील पागोटे गावात राहत होता. कंटेनर ट्रेलरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या राजकुमारला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा संशय होता, ज्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायची. २५ ऑगस्टच्या रात्री याच संशयावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात रामने पत्नीला खोलीत कोंडून ठेवले. तिचे तोंड बांधले, हातपाय बांधले आणि अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत जगरानीचा भाजून मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्यावर रामने तिने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली, असे पोलिसांना सांगीतले. त्यावरुन उरण पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. त्यानंतर, राम आपल्या मुलीला घेऊन उलवे येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, राम आपल्या मुलीसोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, राजकुमारने आपला बनाव कायम ठेवला, पण त्याच्या सात वर्षांच्या मुलीने पोलिसांसमोर संपूर्ण सत्य सांगितले. वडिलांनीच आईला रॉकेल टाकून पेटवून दिले, अशी साक्षच मुलीने पोलिसांसमोर दिल्याने खुनाचा उलगडा होऊ शकला. मुलीच्या या साक्षीनं पोलिसांनी तात्काळ राम शिरोमणी शाहूला अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे