

Bharat Gogavale Birwadi Gram Panchayat flag hoisting
महाड: महाड तालुक्यात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशाताई आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड तालुक्यातील एकूण १३४ ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. प्रत्येक गावात ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय आहे. त्यांचे स्मरण हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे. देशाला जगात पहिल्या तीन क्रमांकात पोहोचवण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे आवाहन केले. त्यांनी सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
महाड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी पोपट ओमासे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाड नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काँग्रेस पक्षातर्फे हुतात्मा वसंत दाते चौकामध्ये माजी नगराध्यक्ष सुदेश कलमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाड ब्राह्मण सभेच्या प्रांगणात ज्येष्ठ वकील आदित्य भाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रायगड विभागाचे प्रवेशद्वार असणाऱ्या लाडवली ग्रामपंचायतीत सरपंच मूबिना ढोकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने १५ दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याण अनुदानाचे वाटप करण्यात आले.
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग येथील मुख्यालयात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाही, जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.